मुंबई : टाटा मोटर्सने आपली नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. कंपनीने ही इलेक्ट्रीक कॉम्पॅक्ट सेदान कार बाजारात आणली आहे. टाटा मोटर्सची टिगोर ईव्ही इलेक्ट्रिक ही कार बाजारात उतरविण्यात आली आहे. टाटाची टिगोर ईव्ही ही कार एकदा चार्ज केल्यानंतर २१३ किलोमीटर अंतर सहज धाऊ शकेल, असा दावा कंपनीने केला आहे.
टाटा टिगोर कार तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असणार आहे. एक्सईप्लस, एक्सएमप्लस आणि एक्सटीप्लस असे तीन व्हेरिअंट आहेत. राज्यातील तीस मोठ्या शहरांमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत ९.४४ लाख रुपये आहे.
उच्च श्रेणीतील इलेक्ट्रिक टिगोर एकदा संपूर्ण चार्ज केल्यानंतर २१३ किमीपर्यंत धावू शकेल. मात्र जुनी कार १४२ किमी अंतर कापत होती। नवीन इलेक्ट्रिक टिगोरमध्ये २१.५ kWh ची बॅटरी पॅक देण्यात आला आहे. तर जुन्या मॉडेलमध्ये १६,२ kWh बॅटरी पॅक आहे. इलेक्ट्रिक टिगोरमध्ये एक ७२ व्ही, ३-फेस एसी इंडक्शन मोटर देण्यात आली आहे, जी ४,५००० आरपी वर ३० केडब्ल्यू (४१ एचपी) ऊर्जा आणि २,५०० आरपीएम वर १०५ एनएम टॉर्क जनरेट करते. कारमध्ये दोन ड्रायव्हिंग मोड आहेत (ड्राइव्ह आणि स्पोर्ट)
इलेक्ट्रिक टिगोरच्या टॉप व्हेरिएंट एक्सटी + मध्ये ब्लूटूथसोबत हार्मोनचा २ डीआयएन ऑडिओ सिस्टिम , यूएसबी आणि एएक्स कनेक्टिव्हिटी, १४ इंच अलॉय व्हील्ज, सीटची उंची कमी जास्त करु शकता, शार्क फिन अँटेना आणि एलईडी टेल लॅम्पसह ऑडिओ सिस्टम आहे. अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) सर्व प्रकारांमध्ये आहे. एक्सई + व्हेरियंटमधील फक्त ड्रायव्हरच्या बाजूने एअरबॅग आणि अन्य दोन्ही प्रकारांमध्ये ड्युअल एअरबॅग देण्यात आल्या आहेत।
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे केंद्र सरकारने इलेक्ट्रिक कार तयार करण्याचे आवाहन कार उत्पादक कंपन्यांना केले होते. या पार्श्वभूमीवर टाटा मोटार्सने इलेक्ट्रिक कार बनविण्यास प्राधान्य दिले. याआधी टाटाने 'टियागो' ही कार लॉन्च केली होती. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर १०० किलोमीटर अंतर कापत होते. टियागो ही टाटाची छोटी कार आहे.
मात्र, या कारला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. आता टाटाने नवीन कार लॉन्च केली आहे. त्याआधी टाटाने इलेक्ट्रिक कार बनवण्याच्या तयारी सुरु केली होती. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार २०२१ सालापर्यंत इलेक्ट्रिक कार आणण्याची टाटाची रणनिती होती. मात्र, त्याआधीच टाटाची दमदार कार बाराजात लॉन्च करण्यात आली आहे.