'अरे देवा, आता ही बाहेर कशी येणार,' लॅपटॉप स्क्रीनच्या आत पोहोचली मुंगी; VIDEO व्हायरल

एक मुंगी थेट लॅपटॉपच्या आत पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंगी स्क्रीनच्या आतामध्ये फिरत असल्याचं पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Oct 4, 2024, 03:24 PM IST
'अरे देवा, आता ही बाहेर कशी येणार,' लॅपटॉप स्क्रीनच्या आत पोहोचली मुंगी; VIDEO व्हायरल title=

सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुंगी थेट लॅपटॉपच्या स्क्रीनच्या आत घुसली असून फिरताना दिसत आहे. एक्सवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्याला 4 लाखांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. आदित्य नावाच्या तरुणाने हा व्हिडीओ शेअर केला असून, त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

व्हिडीओमध्ये आदित्य स्क्रीनवर फिरणारी मुंगी दाखवताना दिसत आहे. सुरुवातीला ही मुंगी बाहरेच्या बाजूला फिरत असल्याचं वाटत आहे. पण नंतर जेव्हा तो हात ठेवतो तेव्हा ती मुंगी बाहेर नसून आतल्या बाजूला असल्याचं समजतं. 'ही मुंगी माझ्या स्क्रीनच्या आत आहे,' असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. हे पटवून देण्यासाठी तो स्क्रीनवर बोट ठेवूनही दाखवतो.

हे कसं काय झालं?

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना मुंगी नेमकी लॅपटॉपच्या आत गेली कशी हा प्रश्न पडला आहे. 

आकाश मनोहर नावाच्या एका व्यक्तीने असा अंदाज लावला आहे की, लॅपटॉपची निर्मिती करताना मुंगीचं अंड आत राहिलं असावं. “बहुधा ही मुंगी स्वत:हून स्क्रीनच्या आत गेली नसावी. बहुधा हे अंड्यातून आलं असावं जे निर्मितीदरम्यान आत राहिलं असाव. लॅपटॉप वापरताना निर्माण झालेल्या उष्णतेमुळे ते उबवण्यास मदत झाली,” अशी थिअरी त्याने मांडली आहे. 

“मला 2020 च्या आसपास याच समस्येचा सामना करावा लागला होता. स्क्रीन विनामूल्य बदलण्यासाठी भारतात Apple सपोर्टशी मला संघर्ष करावा लागला. त्यांनी यासाठी मलाच दोष देण्याचा प्रयत्न केला,” असा खुलासा त्याने केला.

आदित्यने मात्र हा सिद्धांत फेटाळून लावला. आपल्याकडे चार वर्षांपासून लॅपटॉप असून एखादे अंडे इतके दिवस टिकेल अशी शक्यता नाही. त्याऐवजी, चार्जिंग पोर्ट किंवा इतर कोणत्याही पोकळीतून मुंगी स्क्रीनमध्ये शिरली असावी असा अंदाज त्याने मांडला असावा.

"माझ्या डेस्कवर मी या लहान मुंग्या पाहिल्या आहेत, ज्या कदाचित चार्जिंग पोर्ट कॅव्हिटी किंवा हार्डवेअरमधील इतर कोणत्याही एंट्री पॉइंटमधून वर गेली असावी," असं तो म्हणाला असावा. 

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

दरम्यान या व्हिडीओने नेटकऱ्यांचं मनोरंजनही केलं. एकाने त्याला फ्री डायनॅमिक पेपर म्हटलं. तर एकाने कर्सरने तिला दाब असा सल्ला दिला.