मुंबई : पिरीयड्स म्हणजेच मासिक पाळीचा काळ प्रत्येक महिलेसाठी फार नाजूक असतो. अशा दिवसात आरोग्याबाबत काहीही चूक झाली तरी इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक वाढतो. सामान्यपणे महिलांच्या मासिक पाळीचं चक्र हे 28 दिवसांचं असतं. मात्र तुम्ही कधी शॉर्ट पीरियड्स सायकलबद्दल ऐकलं आहे का? यामध्ये महिलांना 15 दिवसांच्या अंतराने मासिक पाळी येते.
एखाद्या महिलेला दर 20 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी मासिक पाळी येत असेल तर त्याला शॉर्ट मेंस्ट्रुअल सायकल म्हणतात. म्हणजेच मासिक पाळीचं अंतर लहान असतं. पहिल्यांदा अंडी ओव्हरीमध्ये तयार होतं. त्यानंतर, प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या मदतीने, अंडाशय आणि गर्भाशयात एक थर तयार केला जातो, जर हा थर लवकर तयार केला गेला आणि त्या दरम्यान रक्तस्त्राव झाला तर 15 दिवसांनी कालावधी येतो.
दरम्यान शॉर्ट मेंस्ट्रुअल सायकल अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. कधीकधी रक्ताच्या गुठळ्या देखील तयार होतात. असं वारंवार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही गोष्ट औषधाच्या मदतीने बरी होऊ शकते.
अनेकदा महिलांना त्यांच्या मासिक पाळीवेळी रक्तस्रावादरम्यान फरक जाणवतो. हेवी आणि दीर्घकाळ चालणारी मासिक पाळी काही आजार किंवा रक्तासंबंधीच्या विकारांचे संकेत देतात. जर मासिक पाळीदरम्यान असामान्यपणे तुम्हाला रक्तस्राव कमी होत असेल तर यामुळे गर्भधारणेत समस्या, रोजनिवृत्ती, किंवा पीसीओएससारख्या समस्या उद्भवू शकतात.