वॉशिंग्टन: चीनच्या वुहानमधून कोरोना व्हायरस पसरला ही बाब जरी चीन मान्य करत नसलं तरी अमेरिका मात्र त्यांच्या मागावर आहे. अमेरिकेनं पुन्हा एकदा यावरून चीनवर निशाणा साधला आहे. अमेरिकेतील एक रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे. चीनच्या रिसर्च लॅबमधूनच व्हायरस लीक झाल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की वुहानमधील विषाणूशास्त्र संस्थेच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या व्हायरसमध्ये बदल केले. ज्यामुळे तो माणसांमध्ये संसर्ग करू शकतो.
चीनकडून हे बदल लपवण्याचे खूप प्रयत्नही झाले. ही माहिती जगासमोर येऊ नये यासाठी चीननं पुरावे नष्ट कराणाचाही प्रयत्न केल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे. हा रिपोर्ट रिपब्लिकन प्रतिनिधी आणि सदन परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य माईक मॅककॉल यांनी सादर केला आहे. याआधी चीननं सुरुवातीच्या कोरोनाग्रस्तांचे रिपोर्ट आणि डेटा डिलीट करण्याचाही प्रयत्न केल्याचे आरोप चीनवर करण्यात आले होते.
कोरोना व्हायरस पसरण्यामागे वुहान व्हायरलॉजी इन्स्टिट्यूटचा मोठा हात असल्याचं त्यांनी या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ज्यात अमेरिकन तज्ञांचाही समावेश होता. त्याला चीनसह अमेरिकन सरकारकडून निधी मिळाला होता असा धक्कादायक दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. माईक यांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
वुहानच्या मार्केटमध्ये 12 डिसेंबर 2019मध्ये हा व्हायरस लीक झाल्याचा दावा या रिपोर्टनुसार करण्यात आला आहे. त्याचे काही पुरावे देखील सापडल्याचं माईक यांनी म्हटलं आहे. हा व्हायरस केवळ 2 वर्ष जुना आहे. तर 2019 मध्ये कोरोनाच्या विषाणूवर ज्या लॅबमध्ये रिसर्च सुरू होता तिथल्या 3 जणांना याची लागण झाली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. याचा उल्लेख अमेरिकी इंटेलिजेंस रिपोर्टमध्ये देखील करण्यात आला होता.
यानंतर 1 महिन्याने चीनने श्वसनाशी संबंधित आजाराची माहिती संपूर्ण जगाला दिली होती. म्हणजे तब्बल एक महिना चीननं ही गोष्ट लपवली होती. कोरोनाने आतापर्यंत 44 लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोट्यवधी लोकांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे आता डेल्टा व्हेरिएंटचा बुमरँग चीनमध्ये होत आहे.