Fact Check: बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर परिस्थिती चिघळली आहे. शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि देश सोडल्यानंतर लष्कराने सत्ता हातात घेतली आहे. मात्र देशात सुरु असलेला हिंसाचार अद्यापही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. त्यातच आता बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंनाही (Hindu) लक्ष्य केलं जात आहे. बांगलादेशातील कट्टरवादी पक्ष जमात-ए-इस्लामीने कबूल केलं आहे की, शेख हसीना यांचं सरकार पडल्यानंतर देशात हिंदू अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. सोशल मीडियावर बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
यादरम्यान सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तरुणीच्या चेहऱ्यावर पट्टी लावण्यात आली असून, हात-पाय बांधल्याचं दिसत आहे. शेअर करणाऱ्यांनी हा व्हिडीओ बांगलादेशचा असल्याचा दावा केला आहे. मुस्लिमांनी हिंदू तरुणीचं अपहरण केलं असून, हात-पाय बांधून रस्त्यावर बसवलं असा दावा पोस्ट शेअर करताना केला जात आहे.
फेसबुकवर फोटो शेअर करताना एका व्यक्तीने लिहिलं आहे की, “बांगलादेशातील जिहादींच्या तावडीत अडकलेली एक असहाय्य हिंदू मुलगी, कोणीही मदतीसाठी पुढे येत नाही, काही काळानंतर रानटी लांडगे तिला आपल्या वासनेचा शिकार बनवतील आणि तिची हत्या करतील. भारताच्या ढोंगी हिंदूंनो, जागे व्हा, अजून वेळ आहे".
फॅक्ट चेकमध्ये हा फोटो सध्याचा नसून जुना असल्याचं सिद्ध होत आहे. हा फोटो, व्हिडीओ ढाकाच्या जगन्नाथ य़ुनिव्हर्सिटीमधील आहे, जिथे एक तरुणी आत्महत्येवरुन आंदोलन करत होती.
क्रीफ्रेम्सला रिव्हर्स सर्च केल्यानंतर काही फेसबुक पोस्टमध्ये हा व्हिडीओ 18 जुलैचा असल्याचं सिद्ध झालं. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये व्हिडीओ जगन्नाथ युनिव्हर्सिटीचा असल्याचं सांगण्यात आलं होतं.
गुगल मॅपवर बांगलादेशातील ढाका येथील जगन्नाथ विद्यापीठाची छायाचित्रं पाहिली असता त्यात युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये एक पुतळा आणि बस दिसत आहे, जी व्हायरल व्हिडिओमध्ये देखील पाहिली जाऊ शकते. यावरून हा व्हिडीओ तिथलाच असल्याचं स्पष्ट होत आहे.
बांगलादेशच्या नोआखली जिल्ह्यातील यूट्यूबर अश्रफुल इस्लामने हा व्हिडीओ शेअर केला होता. त्याने सांगितलं की, ढाका येथील जगन्नाथ विद्यापीठात झालेल्या एका निदर्शनाचा हा व्हिडिओ आहे, जिथे एका मुलीने आत्महत्या केली होती. अवंतिका असं या मुलीचं नाव होतं. व्हिडीओत जी मुलगी दिसत आहे ती अवंतिकाच्या आत्महत्येचा निषेधार्थ आंदोलन करत होती.
जगन्नाथ विद्यापीठात शिकणाऱ्या फैरुज सदफ अवंतिका या विद्यार्थिनीने यावर्षी 15 मार्च रोजी राहत्या घरी गळफास लावून घेतला होता. आत्महत्या करण्यापूर्वी तिने फेसबुक पोस्ट लिहिली होती. यामध्ये तिने रेहान सिद्दीकी अम्मन नावाच्या विद्यार्थ्याला आणि दीन इस्लाम नावाच्या शिक्षकाला जबाबदार धरलं होतं. यानंतर अवंतिकाला न्याय मिळावा यासाठी काही विद्यार्थी कॉलेजमध्ये आंदोलन करत होते. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
अवंतिकाच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी जगन्नाथ विद्यापीठात मेणबत्त्या पेटवून निषेध करण्यात आला. यावेळी त्रिशा नावाच्या मुलीने तोंडाला पट्टी लावून हात-पाय बांधून प्रात्यक्षिक केलं. या आंदोलनाचा एक व्हिडीओही युट्यूबवर आहे. यामध्ये सर्व विद्यार्थी आंदोलन करताना दिसत आहेत.
म्हणजेच थोडक्यात हा व्हिडीओ बांगलादेशाच्या विद्यापीठातील आंदोलनाचा असून त्याला आता सुरु असलेल्या हिंसाचाराशी जोडून शेअर केला जात आहे. पण या व्हिडीओचा आणि सध्याच्या हिंसाचाराचा काही संबंध नाही.