बिजिंग : कोरोना, कोविड १९ असेच शब्द गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाला बेजार करत आहेत. जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसविषयीची ही भीती पाहता बऱ्याच ठिकाणच्या प्रशासनांकडून प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात येत आहे. अनेक ठिकाणी तर काही कडक निर्बंध लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. लॉकडाऊन हे त्यापैकीच एक पाऊल.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उचलण्यात आलेलं हे प्रत्य़ेक पाऊल अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे. पण, यामध्ये आता पती- पत्नीच्या नात्यांवर गदा येताना दिसत आहे. चीनमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहता जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे.
परिणामी अनेकांनी घरातच राहत बाहेर न जाण्याला प्राधान्य दिलं आहे. असं असलं तरीही, घरी असणाऱ्या चीनी जोडप्यांमध्ये मतभेद वाढले असून, त्यांच्याकडून आता थेट घटस्फोटाचाच निर्णय घेण्यात येत असल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. चीनमधील दाझौ प्रांतातील अधिकाऱ्यांचा हवाला देत प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार गेल्या काही दिवसांपासून ही जोडपी घरात आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही कारणांस्त मतभेद झाल्याचा अंदाज असावा. हे वाद विकोपास गेल्यामुळे या जोडप्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं सांगण्यात येत आहे.
पाहा, कोरोनाच्या दहशतीत इटलीमध्ये असा सुरु आहे जगण्याचा 'सुरेल' संघर्ष
दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे घटस्फोटांच्या अर्जांची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे. यातील काही अर्ज समुपदेशनाच्या सत्रांनंतर मागेही घेतले जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे. त्यामुळे कोरोनाचा आता खासगी आयुष्यातही फटका बसू लागल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.