मुंबई : भारताने अनेक प्रसंगी जागतिक मंचावर दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला सुनावलं आहे. तर पाकिस्तानला साथ देणाऱ्या चीनला देखील लक्ष्य केले आहे. सोमवारी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून थेट चीनवर निशाणा साधला. भारताने दहशतवादाशी लढा देण्याच्या मुद्द्यावर चीनला "दुहेरी भूमिकेबाबत चांगलंच झापलं. भारतीय प्रतिनिधीने म्हटले की, स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणारी कोणतीही "जबरदस्ती किंवा एकतर्फी" कृती सामायिक सुरक्षेच्या तत्त्वाचे उल्लंघन करते. जेव्हा देश एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर करतात तेव्हाच सामायिक सुरक्षा असू शकते, असेही भारताने म्हटले आहे.
चीनने बोलवली होती UNSC ची बैठक
संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी सोमवारी 'संवाद आणि सहकार्याद्वारे समान सुरक्षा वाढवणे' या विषयावरील UNSC बैठकीत संबोधित करताना सांगितले की, सर्व देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा, प्रादेशिक अखंडतेचा आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा आदर केला पाहिजे. झालेल्या करारांचा आदर केला पाहिजे. UNSC ची ही बैठक चीननेच बोलावली होती आणि भारताने या बैठकीला थेट त्यांनाच लक्ष्य केले. चीन ऑगस्टसाठी सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष आहे आणि 15 सदस्यांच्या परिषदेत व्हेटो अधिकारी आहे.
पाकिस्तानवरही निशाणा
चीन आणि त्याचा निकटवर्तीय मित्र पाकिस्तानची खिल्ली उडवत कंबोज म्हणाले, "जेव्हा सर्व देश दहशतवादासारख्या सामायिक धोक्यांविरुद्ध एकत्र उभे राहतील आणि दुटप्पी मापदंड स्वीकारत नाहीत तेव्हाच समान सुरक्षा शक्य आहे." संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. या प्रदेशातील आक्रमक भूमिकेबद्दल त्यांनी चीनवरही निशाणा साधला. "कोणतीही जबरदस्ती किंवा एकतर्फी कृती जी यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न करते ती सामायिक सुरक्षेचे उल्लंघन आहे," असे ही कंबोज म्हणाल्या.
अलीकडच्या काळात चीनने तैवानबाबत दाखवलेल्या आक्रमकतेला कंबोज यांचे विधान चर्चेत राहिले. याशिवाय पाकिस्तानातून कार्यरत कुख्यात दहशतवादी मसूद अझहरला घेऊन चीन भारताच्या मार्गात अडथळे आणत आहे आणि संयुक्त राष्ट्रात त्याचा बचाव करत आहे.