Gold Cash In Secret Bunker: इस्रायलने सोमवारी एक खळबळजनक दावा केला आहे. हिजबुल या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाहला इस्रायलने 27 सप्टेंबर रोजी केलेल्या हल्ल्यात ठार केलं. यानंतर आता इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरुतमध्येच हिजबुलचा मोठा खजिना असल्याचा दावा केला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेस म्हणजेच आयडीएफने बेरुतमधील एका इमारती खालील गुप्त बंकरमध्ये कोट्यवधी रुपये कॅश आणि सोनं असल्याचा दावा केला आहे. या पैशांचा वापर दहशतवादी संघटना करत असल्याचा आयडीएफचा दावा आहे.
रविवारी इस्रायलने हवाई हल्ल्यांमध्ये बेरुतमधील अनेक ठिकाणांवर क्षेपणास्रांनी मारा केल्यानंतर हिजबुलचा खजिना सापडल्याचा दावा केला आहे. आयडीएफचे प्रवक्ते रेअर अॅडिरल डॅनिअल हगारी यांनी या कथित खजिन्यासंदर्भातील खुलासा केला. टीव्हीवर दिलेल्या एका भाषणात त्यांनी याबद्दलची माहिती दिली. "आज मी एक गुप्त माहिती सांगणार असून काही ठिकाणांवर आम्ही हल्ले केले नाहीत त्यापैकी एक ठिकाणी हिजबुलाचे कोट्यवधी रुपये आणि सोन्याचा साठा आहे. सोनं आणि रोख रक्कम साठवून ठेवलेली ही जागा म्हणजे हिजबुला संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाहला वास्तव्यास असलेले बंकर्सच आहेत," असं आयडीएफच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसा आणि सोनं असल्याने इथे आम्ही हल्ला केला असल्याचं आयडीएफचे प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं. "एका अंदाजानुसार इथे किमान अर्धा बिलीयन अमेरिकी डॉलर्सची रोख रक्कम आणि सोनं बंकरमध्ये आहे. हा पैसा लेबनॉनला पुन्हा उभं करण्यासाठी वापरता येईल," असंही आयडीएफच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
रविवारी इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 30 ठिकाणांवर बॉम्ब वर्षाव करण्यात आला. हिजबुलाशीसंबंधित अल कर्ज अल हसनच्या (एक्यूएएच) या संस्थेच्या ठिकाण्यांवर हल्ला करण्यात आला. एक्यूएएच ही संस्था सेवाभावी संस्था म्हणून नोंदणीकृत असली तरी अनेकदा इस्रायल आणि अमेरिकेने या संस्थेवर हिजबुलाला मदत करण्याचा ठपका ठेवला आहे. हिजबुलाला लष्करी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवण्याबरोबरच सोन्याच्या माध्यमातून अर्थ पुरवठा करण्यात एक्यूएएच गुप्तपणे मदत करत असल्याचा या दोन्ही देशांचा दावा आहे.
इस्रायलने ज्या इमारतीखाली मोठा सोन्याचा साठा असल्याचा दावा केला आहे ते ठिकाण एक रुग्णालय आहे. या रुग्णालयाचं नाव अल साहेल रुग्णालय असं आहे. इस्रायलने केलेल्या दाव्यानुसार या रुग्णालयाखालील गुप्त बंकर्समध्ये 500 मिलियन अमेरिकी डॉलर्सचा सोन्याचा साठा आहे. ही रक्कम भारतीय चनलानुसार 42,03,43,62,250 इतकी होते. डॉलरच्या आजच्या दरानुसार या रक्कमेचं मूल्य भारतीय चलनाप्रमाणे 4203 कोटी 43 लाख 62 हजार 250 रुपये इतकं आहे.
“Tonight, I am going to declassify intelligence on a site that we did not strike—where Hezbollah has millions of dollars in gold and cash—in Hassan Nasrallah’s bunker. Where is the bunker located? Directly under Al-Sahel Hospital in the heart of Beirut.”
Listen to IDF Spox.… pic.twitter.com/SjMZQpKqoJ
— Israel Defense Forces (@IDF) October 21, 2024
आयडीएफच्या प्रवक्त्यांच्या दाव्यानुसार, केलेल्या हल्ल्यांमध्ये अनेक ठिकाणी अशा तिजोऱ्या सापडल्या आहेत ज्यामध्ये कोट्यवधींची रोख रक्कम होती. तसेच हा पैसा इस्रायलवर हल्ला करण्यासाठीच्या लष्करी कारवायांमध्ये हिजबुलाकडून वापला गेला असंही इस्रायलचं म्हणणं आहे. हा सर्व पैसा ताब्यात घेतला आहे किंवा नष्ट केला आहे किंवा जप्त केला आहे याबद्दलचा खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र भविष्यातही असे हवाई हल्ले होतील अशी दाट शक्यता इस्रायलने व्यक्त केली आहे. खास करुन हिजबुलाच्या आर्थिक केंद्रांवर हल्ले केले जातील असं सांगण्यात आलं आहे.
इस्रायलने हल्ला केलेली एक्यूएएच ही संघटना लेबनॉनमध्ये 1980 च्या दशकापासून कार्यरत आहे. सोनं तारण ठेवण्याच्या मोबदल्यात ही संघटना लेबनॉनमधील लोकांना पैसे देण्याची सेवा पुरवते. मात्र गुप्तपणे ही संस्था इस्रायलविरोधातील कारवायांसाठी पैसे पुरवत असल्याचा अमेरिका आणि इस्रायलचा दावा आहे. मात्र इस्रायलच्या दाव्याला अमेरिकेने समर्थन दिलं नाही. अल साहेल रुग्णालयाखाली सोन्याचे मोठे साठे असल्याचा काही सबळ पुरावा आम्हाला आढून आलेला नसल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे.