US Citizenship Latest Update : अमेरिकेमध्ये (Jobs In America) अनेक वर्षे नोकरी किंवा तत्सम कारणांनी वास्तव्यास असणाऱ्या बहुतांश नागरिकांना जगातील या विकसित राष्ट्राच्या नागरिकत्वाचा कायमच हेवा वाटत राहतो. काही मंडळी या नागरिकत्वासाठी आवेदनही करतात. पण, अनेक कारणांनी हे नाकरिकत्वं नाकारलं जातं. आता मात्र अशी परिस्थिती राहणार नसून, अमेरिकेत नागरिकत्वासंदर्भात काही बदल करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.
उपलब्ध माहितीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन येत्या काळात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. या निर्णयामुळं कोणत्याही कागदपत्रांशिवाय अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या अमेरिकन नागरिकांच्या जोडीदारांना या देशाचं नागरिकत्वं मिळणं आणखी सोपं होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार अमेरिकेमध्ये नोकरी करणाऱ्या आणि अनेक स्थानिक नागरिकांचे जोडीदार म्हणून वास्तव्यास असणाऱ्या असंख्य भारतीयांनाही याचा फायदा होणार आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या माहितीनुसार अमेरिकन नागरिकांशी लग्न केलेल्या तरीही अमेरिकेमध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्यांसाठी हा 'प्रोटेक्शन प्रोग्राम' लागू असेल. या नव्या तरतुदीमुळं येत्या काळात अशा जवळपास 5 लाखांहून अधिक नागरिकांना 'वर्किंग व्हिसा' आणि देशाचं नागरिकत्वं मिळणं आणखी सोपं होणार आहे.
'पेरोल इन प्लेस' नावाच्या या उपक्रमाअंतर्गत पाच लाख अनिवासी अमेरिकन नागरिकांना याचा थेट फायदा होणार असून, ते डिपोर्टेशन प्रक्रियेच्या कचाट्यात सापडणार नाहीयेत, जिथं त्यांना ग्रीन कार्ड मिळणं अधिक सोपं होणार आहे. विविध कागदपत्रांच्या तरतुदींवर कोणत्याही अमेरिकन नागरिकाची पती अथवा पत्नी यांना इथं वर्क परमिटसुद्धा दिलं जाणार आहे.
अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीची ही प्रक्रिया सोपी दिसत असली तरीही तिथं काही अटींची पूर्तता केली जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. नागरिकत्वं त्याच अनिवासी नागरिकांना बहाल केलं जाणार आहे ज्यांनी अमेरिकन नागरिकांसोबतच्या वैवाहिक नात्यानंतर देशात किमान 10 वर्षे वास्तव्य केलं आहे. याशिवाय त्यांच्या मुलांनाही ग्रीन कार्ड देण्यात येणार आहे.
सध्याच्या घडीला अमेरिकेत लागू असणाऱ्या नियमांनुसार जर एखाद्या व्यक्तीनं अमेरिकन नागरिकाशी लग्न केलं आणि वर्षभराहून अधिक काळासाठी देशात कोणत्याही कागदपत्रांशिवाय वास्तव्य केल्यास या व्यक्तींना मोठ्या कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं. अनेक प्रकरणांमध्ये सदर व्यक्तीला 10 वर्षांसाठी देशात प्रवेशही नाकारला जातो. ज्यामुळं नव्या तरतुदी इथं मोठी मदत करताना दिसणार आहेत. 17 जूनपर्यंत अमेरिकेत वास्तव्याची 10 वर्षे झालेल्यांना या बदलांचा थेट फायदा मिळणार आहे. दरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या निर्णयाची निंदा करत ही प्रक्रिया 'अस्थिर' असल्याचं म्हणत, आपण राष्ट्राध्यक्ष पदावर आल्यास कागदपत्रांशिवाय देशात वास्तव्यास असणाऱ्यांना स्थलांतरित करण्याचं वचन नागरिकांना उद्देशून केलं.
यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुका होणार असून, सध्या घेण्यात आलेला हा निर्णय म्हणजे एक मास्टरस्ट्रोक समजला जात आहे. आता या प्रस्तावित कार्यक्रमाची प्रत्यक्षात सुरुवात केव्हा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.