Social Media Influencer Selling Bathwater: तुम्ही सोशल मीडियावर फार सक्रीय असलात तरी तुम्ही बेले डेल्फीन हे नाव वाचलं किंवा ऐकलं असल्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र पाश्चिमात्य देशांमधील अनेकांना बेले डेल्फीन हे नाव चांगलेच ठाऊक आहे. सोशल मीडिया इनफ्ल्युएन्सर म्हणून लोकप्रिय झालेली डेल्फीन ही सध्या ओनली फॅन्स या अडल्ट कंटेट उपलब्ध असलेल्या सोशल नेटवर्किंग साईटवर प्रचंड लोकप्रिय आहे. डेल्फीन सर्वात आधी चर्चेत आली ती 2019 साली. सातत्याने आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याने डेल्फीनचं इन्स्टाग्राम अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं होतं. ही कारवाई झाली तेव्हा डेल्फीनचे इन्स्टाग्रामवर 45 लाख फॉलोअर्स होते. त्यामुळेच तिच्यावरील कारवाई ही पेज थ्रीवरील बातमी ठरली होती.
डेल्फीनला सोशल मीडियावर लोकप्रियता मिळण्यास सुरुवात झाली ती 2018 सालापासून. डेल्फीनने गुलाबी रंगाचं विग घालून फोटो तसेच व्हिडीओ पोस्ट करु लागल्याने ती चर्चेत आली. याच काळात काही महिन्यांमध्ये तिच्या फॉलोअर्सची संख्या 8.5 लाखांवरुन 45 लाखांवर पोहोचली. डेल्फीनला 'ई-गर्ल' अशी ओळख मिळाली आणि अनेकजण तिची स्टाइल फॉलो करण्यास सुरुवात केली. इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स मिळाल्याने तिने 'पॉर्नहब'वरही अकाऊंट सुरु केलं. अडल्ट कंटेट स्टार झाल्यानंतर मात्र डेल्फीनने अनेकदा चुकीचे मथळे तसेच माहिती दिल्याने चाहते तिच्यावर संतापले. मात्र यापेक्षाही सर्वाधिक चर्चेत राहिला तो डेल्फीनने सुरु केलेला एक जगावेगळा ट्रेण्ड. डेल्फीनने तिच्या चाहत्यांना चक्क स्वत: आंघोळ केलेलं पाणी विकण्याचा ट्रेण्ड सुरु केला. याला ती बाथ वॉटर सेल म्हणायची.
जुलै 2019 मध्ये डेल्फीनने तिच्या ऑनलाइन स्टोअरवर 'गेमर गर्ल बाथ वॉटर' नावाने 30 डॉलरला (सध्याच्या दरानुसार 2500 भारतीय रुपये) एक बाटली या दराने पाणी विकण्यास सुरुवात केली. याला एवढा प्रतिसाद मिळाला की 3 दिवसात स्टॉक संपला. इन्स्टाग्रामवर अनेक चाहत्यांनी तू आंघोळ केलेलं पाणीही आम्ही प्यायला तयार असल्याच्या कमेंट्स केल्या होत्या. यामधूनच प्रेरणा घेऊन डेल्फीनने खरोखरच बाथ वॉटर सेल सुरु केला. 'bath water for all you thirsty gamer boys' अशी कॅप्शन डेल्फीनने या कॅप्शनला दिली होती. नुकतीच डेल्फीन लुईस थेरॉक्सच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेली. तेव्हा तिने हे कथित आंघोळीचं पाणी विकून किती पैसा कमावला याबद्दल खुलासा केला.
मी एकूण 600 बाथ वॉटर बॉटल विकल्याचं डेल्फीनने सांगितलं. यामधून तिने 18 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 14 लाख 92 हजार रुपये कमवले. मात्र वेबसाईटवर 30 डॉलर किंमत दाखवली असली तरी आपण 35 डॉलर्सला बाटल्या विकल्याचं डेल्फीनने सांगितलं. याच दराने विक्री झाली असा विचार केल्यास तिने यामधून 21 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 17 लाख 40 हजार रुपये कमवले असं स्पष्ट होतं.
ही संकल्पना कुठून सुचली असा प्रश्न डेल्फीनला विचारण्यात आला. यासंदर्भात बोलताना 24 वर्षीय डेल्फीनने, "ही फार विचित्र संकल्पना होती. मात्र त्यावेळी ही मोठी बातमी झाली. अनेकांना अनेक प्रश्न पडले. ही मुलगी असं आंघोळीचं पाणी का विकतेय? खरंच तिने या पाण्याने आंघोळ केली आहे का? हे पाणी विकत घेणारे याचं करणार काय? असे बरेच प्रश्न विचारले गेले. मात्र या संकल्पनेमधील लैंगिक इच्छा हा महत्त्वाचा भाग होता हे मान्य केलं तरी मला याची संकल्पना खऱ्या अर्थाने जपानमध्ये पॅण्टी (महिलांची अंतर्वस्रं) विकणाऱ्या व्हेंडिंग मशीन्समधून मिळाली," असं सांगितलं.