Lords | लॉर्ड्स नावाचा विद्युत पाळणा

लंडनमध्ये सुप्रसिद्ध विद्युत पाळणा (roller coaster) आहे. ज्याचे नाव लंडन आय(London eye) असे आहे.   

Updated: Aug 17, 2021, 05:44 PM IST
Lords | लॉर्ड्स नावाचा विद्युत पाळणा title=

रवि पत्की, क्रीडा विश्लेषक : लंडनमध्ये सुप्रसिद्ध विद्युत पाळणा (roller coaster) आहे. ज्याचे नाव लंडन आय(London eye) असे आहे. तो अतिशय संथ फिरतो. तुम्ही कधी वर असता कधी खाली. तो त्या प्रवासात आपल्याला लंडन शहराचे रम्य दर्शन घडवतो. लॉर्ड्स कसोटीने सलग पाच दिवस ज्या चढ उतारातून क्रिकेट फॅन्सला नेऊन कसोटी क्रिकेटचे विलक्षण रोमांचक पण रम्य दर्शन घडवले त्यामुळे त्या लंडन आयला 'लॉर्ड्स' असे नाव द्यायला काय हरकत आहे? त्यातून लॉर्ड्स लंडन मध्येच आहे.पाचव्या दिवसापर्यंत कसोटीतील कुठल्याही दिवसाचे तिन्ही सेशन्स एका संघाच्या नावावर नव्हते. म्हणजे कुठलाही संघ आजचा दिवस माझा असे म्हणू शकत नव्हता. (Sports analyst ravi patki blog about india vs england 2nd test at lords cricket ground and London Eye) 

पाचव्या दिवशी शमी आणि बुराहने जी भागीदारी केली तिला तोड नाही. आपल्याला जसे इतर संघाचे तळाचे बॅट्समन त्रास देतात तेच कडू औषध आपण इंग्लंडला पाजले. त्यावेळेस इंग्लंडला शमी आणि बुमराह हे विलक्षण अत्त्याचारी वाटले असणार. काहीही केले तरी त्यांचे अत्याचार थांबेनात. इंग्लंडने चिडून पाहिले,डीवचून पाहिले,थोडे उपहासात्मक कौतुक करून पाहिले.पण शमी आणि बुमराहने निग्रह सोडला नाही. 

'यह शहर वो है जहाँ कोई घर भी खुश नही
दाद ए सितम न दे की सितमगर भी खुश नही' 

असे जफर इक्बालच्या शेरा सारखे इंग्लंडला वाटले असेल. तळाच्या बॅट्समनला टिकून रहायला,चांगल्या बॉलवर विकेट न जायला नशीब लागते.ते सुदैवाने शमी आणि बुमराहला मिळाले. इंग्लंडने दोघांना चिथावून त्यांचा निग्रह अधिक घट्ट केला. विकेट काढायची की खुन्नस काढायची अशा अविचारी द्वंद्वात इंग्लंडचे बॉलर अडकले. जे चेंडू समजले त्याचा सामना शमी आणि बुमराहने उत्तम केला.समजणारा चेंडू येई पर्यंत ते आऊट झाले नाहीत ही दैवी साथ. Luck favours the brave.
 
इंग्लंडची फलंदाजी म्हणजे आनंद आहे. हे आपण दोन्ही टेस्ट मध्ये पाहत आहोत. एकटा रूट ब्लँकेट घेऊन पिचवर झोपून जातो. पण बाकीच्यांना पूर्ण निद्रानाश आहे. ते आले की पिचवर झोपायचं सोडा कधी एकदा आऊट होतो अशा मनस्थितीत येतात. गावस्करने इंग्लंडच्या बॅटिंग वरूनच भारत ही मालिका 4-0 जिंकेल असे भाकीत केले आहे. घरेलू कंडिशन्स मध्ये इंग्लंडची इतकी वाताहात होईल असे वाटत नाही. पण एक अख्खा रूट,एक अख्खा अँडरसन आणि अर्धा बेअरस्टोव्ह ह्या अडीच खेळाडूंच्या संघाला गावस्करने पार गाळात टाकले आहे.

दुसऱ्या डावात 60 ओव्हर्स इंग्लंडला खेळायच्या होत्या. म्हणजे 300 चेंडू होते. बॅटिंग हा एका चेंडूचा खेळ आहे. एक चांगला चेंडू पडला की खेळ खल्लास. त्यामुळे रूट सोडून इतर फलनदाजी शेवटच्या दिवशीच्या दडपणात 300 चेंडू खेळेल असे कधी वाटत नव्हते. 10 चांगल्या चेंडूची गरज होती. ज्या विकेट्स पडल्या ते सर्व डिफेन्स करताना आऊट झाले. ह्यावरून चेंडूंचा दर्जा कळतो. शमीचा सिबलीला पडलेला आणि सिराजचे मोईन, करन ह्यांना पडलेले चेंडू क्रिकेटच्या भाषेत 'जॅफा' होते. लाईन, लेंथ मूव्हमेंट सगळं जमून आलेले स्वप्नवत चेंडू. बुमराहचा रॉबिनसनला पडलेला slower one हा 'बुमराह जिंदा है' ह्याची साक्ष पटवणारा होता.

कोहलीचे विचारचक्र खूप जोरात चालू असते. त्यामुळे तो स्लिप मध्ये उभा रहातो ते पटत नाही. तिथे खूप शांत डोक्याची माणसे लागतात. ऐकवेळेस त्याने मिडॉन किंवा मिडॉफला उभं राहून बॉलरला सारखा त्रास द्यावा(जे तो स्लिप मधूनही करतो).पण तो स्लिप मध्ये नको.

राहुल,रोहित,पुजारा,रहाणे ह्यांनी टॉप ऑर्डर मध्ये उत्तम आणि वेळेवर योगदान दिले ते विसरता कामा नये. अशीच कामगिरी चालू राहिली तर गावस्करची भविष्यवाणी खरी ठरो. Come on India.