रवि पत्की, क्रीडा विश्लेषक : लवलीना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) या आसामच्या मुष्टियोद्धेने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिले आहे. तिची ही खूप मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी म्हणता येईल. सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण लवलीना बॉक्सिंग रिंग मध्ये मार खायला घाबरत असे. कठीण स्पर्धक आला तर ती मनातून माघार घेत असे. तिच्या प्रशिक्षक संध्या गुरुंग (Sandhya Gurung) यांनी हे लवकर ओळखले. रिओ ऑलिम्पिक नंतर लवलीनाला मेडल मिळवूनच द्यायचे असा चंग त्यांनी बांधला. (Tokyo Olympics 2020 Who are the coaches of Lovelina Borgohen and Ravi Kumar Dahiya)
त्यांनी तिला एक मंत्र दिला.बॉक्सिंग रिंग मध्ये स्वतः ला बजावत राहायचे 'मी वाघीण नाही तर वाघ आहे आणि समोरच्याचा खात्मा करणारच'. कधीही अडचणीत आली की कोच ने दिलेला हा मंत्र लवलीना स्वतःशी म्हणते. संध्या गुरुंग अपघातामुळे तीन वर्षे अंथरुणावर होत्या.नंतर बऱ्या होऊन त्यांनी बॉक्सिंग च्या राष्ट्रीय स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल मिळवले. निवृत्त झाल्यानंतर सिक्कीम सरकारने त्यांना कोच होण्याचा आग्रह केला.
कोचिंग डिप्लोमा करून त्या कोच म्हणून रुजू झाल्या. उत्तर पूर्वेकडील मीराबाई चानु नंतर लवलीना च्या रुपात अजून एक चॅम्पियन भारताला मिळाली आहे ती संध्या गुरुंग यांच्या मुळे.
मुराद गैदारेव: टोकियो ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडकलेला रविकुमार दहिया हा कुस्तीगीर हरियाणाचा आहे .सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त त्याचे आदर्श आहेत. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियम मध्ये तो सराव करतो.(ज्या स्टेडियम ने योगेश्वरला घडवले) एक वर्षांपासून तो रशियात बेलारुसच्या मुराद गैदारेव यांच्या कडून ट्रेनिंग घेतोय.
रशिया ही कुस्तीची पंढरी. गैदारेव त्याला रोज वेगवेगळ्या कुस्तीवीरांशी खेळायला लावतो.गैदारेव तसा बंडखोर मल्ल आहे.2004 ऑलिम्पिक मध्ये पंचांचा निर्णय पटला नाही म्हणून त्याने स्पर्धकाला धुतले होते. ऑलिम्पिक 2008 मध्ये त्याला ब्रॉन्झ पदक मिळाले. पण रजत पदक विजेत्याने उत्तेजक पदार्थ घेतल्याचे सिद्ध झाल्याने गैदारेवला रजत पदक देण्यात आले.
दोन्ही कोचेसचे मन:पूर्वक अभिनंदन.