पालकमंत्रिपदाच्या वादाचा फटका; कोकण विभागीय नियोजन बैठकीतून रायगडला वगळलं!

Raigad Guardian Ministership Controversy : जिल्हा विकास आराखडा तयार नसल्याने नियोजन बैठकीतून रायगडला वगळण्यात आलं.

Pravin Dabholkar | Updated: Feb 7, 2025, 09:28 PM IST
पालकमंत्रिपदाच्या वादाचा फटका; कोकण विभागीय नियोजन बैठकीतून रायगडला वगळलं! title=
रायगड पालकमंत्रीपद

Raigad Guardian Ministership Controversy : रायगडच्या पालकमंत्रिपदाचं अजुनही भीजत घोंगडं आहे. पालकमंत्रिपदाच्या वादावर काही तोडगा निघत नसल्याने, जिल्हा म्हणून रायगडला मोठा फटका बसतोय. जिल्हा विकास आराखडा तयार नसल्याने नियोजन बैठकीतून रायगडला वगळण्यात आलं.

राज्यातील पालकमंत्रिपदाची घोषणा होऊन एक महिना होत आला, तरी रायगडचं पालकमंत्रिपद कुणाला द्यायचं हे काही ठरत नाहीये...पालकमंत्रिपदावर एकमताने काही निर्णय होत नसल्याने रायगड जिल्ह्याला याचा फटका सहन करावा लागतोय..पालकमंत्री नसल्याने जिल्हा नियोजन समिती गठीत झाली नाही. त्यामुळे पुढच्या आर्थिक वर्षाचा विकास आराखडा अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे नियोजन मंडळाच्या कोकण विभागीय बैठकीतून रायगड जिल्ह्याला वगळण्यात आलं. दरम्यान जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या वादाचा विकास कामांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं मंत्री भरत गोगावले म्हणतायेत. तर स्वतंत्र बैठक घेवून जिल्ह्याचा विकास आराखडा तयार केला जाईल. पालकमंत्री पदाचा कुठलाही तिढा नाही. काही निर्णय घ्यायला वेळ लागतो अशी सारवासारव राहुल नार्वेकर यांनी केलीय. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष पालकमंत्रिपदावर अडून बसलेत. कुणीही माघार घ्यायला तयार नाहीये.राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या आडमुठेपणाचा जिल्ह्याला मात्र फटका बसतोय.आतातरी जिल्ह्यासाठी राजकीय पक्ष पालकमंत्रिपदाचा निर्णय लवकर घेतील का हे पाहावंच लागेल.

'रायगड पालकमंत्रीबाबतचा निकाल न पटणारा'

पालकमंत्रीपदाच्या निर्णयावर वरिष्ठांसोबत माझी चर्चा झाली नाही. पालकमंत्रीपदाबाबतचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे. अशा निकालाबाबत आम्हाला अपेक्षा नव्हती. जिल्ह्यात पालकमंत्री पदाबाबत माझ्या बाजूने वातावरण झालं असताना असा निकाल कोणालाही न पटणारा आहे. अनपेक्षित निकाल आहे  अशा शब्दांत भरत गोगावले यांनी नाराजी बोलून दाखवली. शेवटी आता वरिष्ठांनी  दिलेला निर्णय मला आणि माझ्यासह आमच्या समर्थकांना मान्य करावा लागेल. परंतु पालकमंत्री पदाबाबत जो काही वरिष्ठांनी निर्णय दिलाय तो कोणालाही न पटणारा आहे. आमचे  नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. भरत गोगावले यांच्या नाराजीबद्दल विचारण्यात आलं असता एकनाथ शिंदे म्हणाले की, "अपेक्षा करणं यात वावगं काय? इतकी वर्षं त्यांनी रायगडमध्ये काम केलं आहे. अपेक्षा ठेवणं, मागणी करणं यात काही चुकीचं नाही. महायुतीमध्ये चर्चा करुन मार्ग काढू". 

अजित पवारांनी रायगडच्या तीन आमदारांची भेट नाकारली

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. रायगडचं पालकमंत्रिपद तटकरे आणि गोगावलेंमध्ये विभागून देण्याची चाचपणी सुरु आहे. शिवसेना नेत्यांची पालकमंत्रिपदासाठी थेट अजित पवार यांची भेट घेतली. याच संदर्भात अजित पवार यांना भेटायला गेलेल्या तीन आमदारांना मंत्रालयाच्या दारातून परत यावे लागले आहे. अजित पवारांनी रायगडच्या तीन आमदारांची भेट नाकारली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे भरत गोगावले यांच्यात विभागुन देण्याची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.  रायगड आणि  संपूर्ण कोकणात आपली ताकद असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळायला हवं, अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे.