पालकांची माघार, तरीही खटला सुरूच राहणार, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटरबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 7, 2025, 08:32 PM IST
पालकांची माघार, तरीही खटला सुरूच राहणार, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी न्यायालयाचा महत्वाचा निर्णय title=

Akshay Shinde Encounter Update: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटरबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय. अक्षय शिंदेच्या कुटुंबाने आम्हाला खटला चालवायचा नाही, अशी भूमिका घेतलीये. मात्र शिंदे कुटुंबाला जरी खटला लढायचा नसला तरीही सुनावणी सुरूच राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.

बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला. या एन्काऊंटरनंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबाने पोलिसांवर फेक एन्काऊंटरचा आरोप केला. आम्ही शेवटपर्यंत लढणार असंही सांगितलं होतं.  मात्र अक्षय शिंदेच्य आई-वडीलांनी आता आपली भूमिका बदललीये. आम्हाला या वयात कोर्टात येणं जमत नाही असं म्हणत त्यांनी असमर्थता दर्शवलीय.  आम्हाला खटला लढवायचा नाही असं त्यांनी म्हंटल. 

मुंबई उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या. आम्ही तुम्हाला बोलवलेले नाही. तुम्हाला यायचं असेल तर या. नाहीतर यायची गरज नाही, सुनावणी मात्र सुरूच राहणार असं कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान कुटुंबाने जरी माघार घेतली तरी मी केस लढणार असल्याचं अक्षय शिंदेच्या वकिलांनी म्हटलं आहे.  

सुनावणीदरम्यान, अक्षयच्या आईने ही केस का लढायची नाही यामागचे कारण कोर्टाला सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, आम्हाला लोकांकडून मोठ्या प्रमाणात टॉर्चर होत आहे असं त्यांनी सांगितलं. 

अक्षय शिंदे हा आरोपी होता. त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायलाच हवी होती. मात्र ती कायद्याच्या चौकटीत राहून. मात्र त्याच्या अचानक झालेल्या एन्काऊंटरवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात न्यायालय आता पुढली कारवाई काय करणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.