अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार? राज्य सरकारकडून तयारी सुरु

राज्यातील महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला. मात्र याच लाडकी बहिण योजनेतील अपात्र बहिणींकडून सरकार आता पैसे परत घेणार आहे.  

शिवराज यादव | Updated: Feb 7, 2025, 08:44 PM IST
अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार? राज्य सरकारकडून तयारी सुरु title=

राज्याच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला. राज्यातील महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला. मात्र याच लाडकी बहिण योजनेतील अपात्र बहिणींकडून सरकार आता पैसे परत घेणार आहे. या योजनेचे मागील 15 दिवसांपासून छाननी सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 

अपात्र बहिणींकडून पैसे परत घेणार?

- लाडकी बहीण योजनेची 15 दिवसांपासून छाननी सुरू आहे
- राज्य आणि जिल्हा पातळीवर पडताळणी सुरू करण्यात आली आहे
- आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त महिलांनी नियमांची पायमल्ली केल्याचं पडताळणीतून समोर
- मार्चपर्यंत सर्व अर्जांची पडताळणी पूर्ण होण्याची शक्यता
- दिवसेंदिवस अपात्र अर्जांची आकडेवारी वाढत चाललीय
- पडताळणीतून मार्चपर्यंत अपात्र बहिणींचा आकडा वाढण्याची शक्यता

महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनीही ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

5 लाख लाडक्या बहिणी अपात्र 

आदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे". 

"अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या 2 लाख 30 हजार महिला आहेत. वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिलांचा आकडा 1 लाख 10 हजार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1 लाख 60 हजार आहेत. यासह एकूण अपात्र महिलांची संख्या 5 लाख होत आहे," अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.  सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे  असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

सरकारमधील मंत्र्यांनीही अपात्र बहिणींचे पैसे परत घेण्यासंदर्भातील चर्चांना अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 'निकषात न बसणाऱ्यांची नावं कमी झाली आहेत', असं सांगितलं आहे. तर प्रताप सरनाईक यांनी अपात्र बहिणी स्वतः पैसे परत करायला तयार असल्याचं सांगितलं. 

सरकारच्या या निर्णयावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. महायुतीने निवडणुकीत मतांसाठी ही योजना सुरू केली होती का? असं म्हणत नाना पटोले यांनाही सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

एकंदरीतच अपात्र लाडक्या बहिणींची या योजनेतून नावं कमी होणार हे आता स्पष्ट झालं आहे. तर अपात्र बहिणींनी घेतलेले पैसेही परत घेतले जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सरकारने निवडणुकीआधी सरसरकट ही योजना राबवण्याचं वचन दिलं होतं. मात्र निवडणुकीनंतर अवघ्या दोनच महिन्यात सरकारने आपल्या वाद्यापासून फारकत घेतल्याचं दिसत आहे.