14 Crore Bonus to Emlpoyeee: चांगली पगारवाढ आणि घसघसशीत बोनस प्रत्येक कर्मचाऱ्याचं स्वप्न असतं. सर्वांचच हे स्वप्न पूर्ण होतं असं नाही. पण अशीही एक कंपनी आहे, जिने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी तिजोरी रिकामी केलीय. ही कंपनी देशभरात चर्चेचा विषय बनला असून कर्मचारी याच कंपनीत नोकरी हवीय, असं म्हणतायत. रेझ्युमे कुठे पाठवायचा? हेदेखील विचारतायत.
तामिळनाडूतील कोवाई डॉटको नावाच्या आयटी कंपनीने 140 कर्मचाऱ्यांना 14.5 कोटी रुपयांचा बोनस जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या कंपनीत साधारण 260 कर्मचारी काम करतात. कंपनीत 3 वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीने हे गिफ्ट दिले आहे. coimbatore.co नावाच्या आयटी कंपनीचे मुख्य कार्यालय कोइम्बतूरच्या नव इंडिया परिसरातील अविनाश रोड येथे आहे. या कंपनीची इंग्लंड आणि चेन्नई येथेही शाखा कार्यालये आहेत.
31 डिसेंबर 2022 पूर्वी कंपनीत सामील होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 3 वर्षांची सर्व्हिस पूर्ण केल्यानंतर त्यांच्या एकूण वार्षिक पगाराच्या 50 टक्के बोनस मिळेल अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात 80 हून अधिक कर्मचाऱ्यांना जानेवारीच्या पगारासह बोनस देण्यात आला.
कंपनीच्या वाढीमध्ये आणि नफ्यात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्यावर आमचा दृढ विश्वास असल्याचे कंपनीचे सीईओ आणि संस्थापक सर्वन कुमार म्हणाले. कर्मचाऱ्यांसोबत कंपनीची संपत्ती वाटण्याचे मार्ग शोधणे हे माझे खूप जुने स्वप्न होते, असेही त्यांनी पुढे सांगितले. कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याच्या पद्धतींचा आम्ही विचार करत होतो तेव्हा सुरुवातीला शेअर मालकी योजना किंवा शेअर जारी करण्याचा आम्ही विचार केला. पण कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात फायदे देण्यासाठी, कंपनीला सार्वजनिक गुंतवणूक वाढवावी लागेल किंवा जनतेला शेअर जारी करावे लागतील. म्हणून आम्ही रोख स्वरूपात बोनस देण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीचे सीईओ म्हणाले.
बँक कर्ज फेडण्यासाठी, घरांसाठी डाउनपेमेंट करण्यासाठी किंवा त्यांच्या गरजेनुसार गुंतवणूक करण्यासाठी आमचे कर्मचारी बोनसच्या पैशांचा वापर करु शकतात, असेही त्यांनी सांगितले.
14 कोटींचा बोनस जाहीर झाल्यानंतर कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाहीय. आम्ही ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीने आम्हाला एक सुखद आश्चर्याचा धक्का दिलाय. त्यांनी आम्हाला दिलेला बोनस आमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त असल्याचे ते म्हणाले. 'आम्हाला आनंद झाला असून आम्ही आमच्या कंपनीच्या विकासासाठी आणखी कठोर परिश्रम करणार असल्याचे कर्मचारी सांगतात. Kovaiकंपनीने 2023 मध्ये वार्षिक 16 दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अलीकडेच त्यांनी बेंगळुरूस्थित फ्लोइक कंपनी विकत घेतली आहे.