Samarjit Ghatge: विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले समरजीत घाटगे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या चर्चेचं कारण म्हणजे समरजीतसिंह घाटगे भाजप मंत्री आणि नेत्यांचीं घेत असलेली सदिच्छा भेट.. त्यामुळे समरजीत घाटने घरवापसी करणार का याची चर्चा जिल्हाच्या राजकारणात सुरू झालीय.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत कागलच्या उमेदवारीचा पेच निर्माण झाल्याने समरजीत घाटगेंनी भाजपला रामराम ठोकला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करत घाटगे यांनी मुश्रीफांच्या विरोधात शड्डू ठोकला.. मात्र समरजीत घाटगेंना विधानसभेला पराभवाचा सामना करावा लागला. राज्यात महायुतीचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर समरजीत घाटगे यांची पावलं पुन्हा भाजपकडे वळताहेत का अशी चर्चा सुरू झालीय.. त्यातच त्यांनी भाजप मंत्री आणि नेत्यांच्या घेतलेल्या भेटींमुळे या चर्चांना बळ मिळालंय.
विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे असा संघर्ष झाला. पण या निवडणुकीत घाटगे यांना पराभव स्वीकारावा लागला. ज्यांच्या मदतीने हसन मुश्रीफ यांचा विजय सुकर झाला ते ठाकरे पक्षाचे नेते संजयबाबा घाटगे याच्या भाजप पक्षप्रवेशाची चर्चा सुरु झालीय. ही चर्चा सुरु झाल्यानंतर काही दिवसातच समरजीत घाटगे यांची भाजप पक्ष प्रवेशाची चर्चा रंगू लागलीय.
कागलमधील मातब्बर नेते समरजीत घाटगे हे विधानसभेआधी भाजपचे कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष होते. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांचा परिचय होता.. मात्र तिकीट मिळणार नसल्यानं त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मात्र आता ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झालीय.समरजीत घाटगेंनी खासगीत बोलताना याला नकार दिला असला तरी पडद्यामागे काही तरी घडामोडी नक्कीच सुरू असल्याचं बोललं जातंय.