मुंबई : सध्या सिंगिग सेन्सेशन रानू मंडलच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहे. ६० वर्षांपूर्वी एका चांगल्या कुटुंबात जन्म घेतलेल्या रानू त्यांच्या दुर्भाग्यामुळे स्वत:च्या आई-वडिलांपासून लांब झाल्या. त्यानंतर त्यांचे लग्न एका आचाऱ्यासोबत झाले. जे बॉलिवूड स्टार फिरोज खान यांच्याकडे काम करत होते. पश्चिम बंगालमधून ते मुंबईत आले. परंतू त्यानंतर त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण होवू लागले. रानू यांचे जीवन फार संघर्षमय होते.
त्यात सोशल मीडियाचे आभार मानावे तेवढे कमीच. तब्बल १० वर्ष रानाघाट रेल्वे स्टेशनवर गाण्याच्या माध्यमातून आपली भूक भागवणारी रानू आता बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकांच्या यादीमध्ये समाविष्ट झाल्या आहेत.
नुकताच आईएएनएसला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, 'माझ्या आयुष्याची कथा फार मोठी आहे. माझ्या या वेदनादायी आयुष्यावर एक चित्रपट नक्की साकारता येईल.' काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानने त्यांना ५५ लाखांचं घर दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतू, त्यांनी यावेळेस अशा अफवांना पूर्णविराम लावले आहे.
रिपोर्टनुसार, रानू मंडल यांच्या आयुष्यावर लवकरच बायोपिक साकारण्यात येणार आहे. निर्माता ऋषिकेश मंडल त्यांच्यावर आधारित बायोपिक साकारणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन खुद्द ऋषिकेश मंडल करणार आहेत. परंतू यावर कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.