मुंबई : 'नटरंग' हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरला. रवी जाधव दिग्दर्शित 'नटरंग' सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत जोरदार डंका वाजवला. या सिनेमातील प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका उत्तम साकारली. या सिनेमातील महत्वाची भूमिका म्हणजे 'गुणा कागलकर'. 'गुणा कलाकार' या भूमिकेसाठी अतुल कुलकर्णी अगोदर महाराष्ट्राचे लाडके भावोजी अभिनेता आदेश बांदेकर यांची निवड झाली होती.
'गुणा कागलकर' ची भूमिका अभिनेता अतुल कुलकर्णीने साकारली आहे. मात्र 'नटरंग' सिनेमाच पहिलं पोस्टर हे आदेश बांदेकर यांच रिलीज करण्यात आलं होतं. स्वतः आदेश बांदेकरांनी याचा खुलासा केला आहे. झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'होम मिनिस्टर' मध्ये दिग्दर्शक रवी जाधव आणि त्यांच कुटुंबिय सहभागी झालं होतं.
यावेळी महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी स्वतः याबाबत कार्यक्रमात माहिती दिली होती. रवी जाधवची गुणा कागलकर करता आदेश बांदेकर ही पहिली पसंती होती. मात्र 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाच शुटिंगच्या तारखा दिल्यामुळे त्यांना सिनेमाकरता वेळ देणं शक्य नव्हतं. महत्वाची बाब म्हणजे या सिनेमाचं आदेश बांदेकरांचं गुणा कागलकर रूपातील पहिल पोस्टर देखील लाँच करण्यात आलं होतं.
'नटरंग' हा रवी जाधव दिग्दर्शित पहिला सिनेमा. आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमातूनच रवी जाधवने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. "नटरंग' हा सिनेमा रसिकांसह समीक्षकांनाही भावला. या सिनेमाला 2010 मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरविण्यात आलं आहे. तसेच विविध अन्य पुरस्कार सोहळ्यातही नटरंगने बाजी मारली.