मुंबई : शालेय अभ्यासक्रमात, वाचनात किंवा मग पाहण्यात अशा काही गोष्टी येतात, त्यावेळी त्या आपल्या मनावर अशी काही छाप सोडून जातात जणू काही त्यांच्याशी आपण अगदी वेगळ्याच पद्धतीने जोडले जातो. एका अतिशय लोकप्रिय छायाचित्राची, चित्राची कहाणीही अशीच आहे. अनेक वर्षांपूर्वी एका चित्रकारानं त्यांच्या कुंचल्यातून असा कलाविष्कार साकारला, जे पाहून पाहणाऱ्या प्रत्येकाचा त्यांच्या डोळांवर विश्वास बसला नाही.
हातात समई घेऊन उभी असणारी, नऊवार नेसेलली एक सौंदर्यवती. समई तेवती रहावी यासाठी तिनं ज्योतीपुढं हात धरला असल्यामुळं प्रकाश हातावर आदळून त्या सौंदर्यवीतीच्याच चेहऱ्यावर परावर्तित झाला आणि त्यामुळं सोनेरी उजेडामध्ये तिचं सौंदर्य झळाळून निघालं, असं सारंकाही एका चित्रात मांडण्यात आलं होतं. प्रकाशाची अचूक दिशा आणि रंगसंगती साकारत अद्वितीय कलाकृती तयार करणारे हे कलाकार होते, एस.एल. हळदणकर.
कर्नाटकातील मैसूर येथील जगनमोहन पॅलेसमधील जयचमा राजेंद्र आर्ट गॅलरी इथं ही कलाकृती ठेवण्यात आल्याचं म्हटलं जातं. या चित्रामागे एक सुरेख कथा सांगण्यात येते, ती अशी 'दिवाळीच्या वेळी हळदणकरांनी त्यांच्या मुलीला (गीता) या रुपात पाहिलं. हातातील ज्योत विझू नये यासाठी तिनं त्याभोवती हात अशा पद्धतीनं पकडला होता, ज्यामुळं त्याचा सर्व उजेड तिच्या चेहऱ्यावर पडला होता. इथूनच या चित्राला प्रेरणा मिळाली.'
अचानकच हे चित्र प्रकाशझोतात येण्याचं कारण, म्हणजे 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनं शेअर केलेली सोशल मीडिया पोस्ट. रिंकूनं नुकतंच तिचं नवं फोटोशूट सर्वांच्या भेटीला आणलं आहे. यामध्ये ती पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. जिथं तिनं गीता हळदणकर यांचा हा ऐतिहासिक लूकही रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. रिंकूच्या या रुपाची सर्वांनीच प्रशंसा केली असून, त्यानिमित्तानं हे मूळ चित्र आणि ते साकारणारे कलाकारही प्रकाशझोतात आले आहेत.