Actor Faced Casting Couch In Initial Days : 'बिग बॉस 17' चा रनर अप ठरलेला अभिनेता अभिषेक कुमार सध्या 'खतरों के खिलाडी 14' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण त्यानं नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीमुळे तो चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे त्यानं या पॉडकास्टमध्ये काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यावेळी त्यानं खुलासा केला की करिअरच्या सुरुवातीला त्याला देखील कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता आणि त्यावेळी त्याची अवस्था कशी झाली होती. इतकंच नाही तर त्यानं त्याच्या करिअरमध्ये किती संघर्ष केला ते देखील सांगितलं.
अभिषेक कुमारनं भारती सिंग आणि हर्ष लिम्बाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हे सगळे खुलासे केले आहेत. अभिषेकनं कास्टिंग काऊचच्या घटनेनंतर त्याला आत्महत्या करण्याचा विचार आला होता आणि त्यानंतर घरी गेल्यानंतर याविषयी कसं आईला सांगितलं हे सांगितलं. जेव्हा हर्षनं त्याला विचारलं की मुंबईला कधी आलास त्यावर उत्तर देत अभिषेक म्हणाला, '2018 मध्ये मी मुंबईला आलो. मी मॅकेनिकल इंजिनीअरींगचं शिक्षण घेतलं होतं. त्यावेळी मी माझ्या कुटुंबाला खोटं सांगितलं की मी 6 महिन्यासाठी दिल्लीमध्ये आहे, पण मी मुंबईत आलो होतो.'
अभिषेकनं पुढे सांगितलं की 'जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला अभिनेता व्हायचंय, तेव्हा मला माझ्या वडिलांनी मला खूप मारलं होतं. तर मी खोटं बोलून इथे आलो. पण मग, इथे आल्यानंतर मी एका समलैंगिक (Gay) व्यक्तीला भेटलो आणि त्यानं माझ्यासोबत गैरवर्तन केलं. खरंतर मी खूप घाबरलो आणि घरी पळून गेलो होतो. मी स्वत: ला आरशात पाहिलं आणि मला लगेच आठवलं काय झालं होतं. मी सगळ्यात आधी घरी जाण्यासाठी तिकिट बूक केलं ते पण एका जनरल डब्ब्याचं.'
अभिषेकनं पुढे सांगितलं की "खरंतर, जेव्हा मी तिथे त्या व्यक्तीला भेटायला गेलो होतो तेव्हा तो माझ्यासोबत असा वागत होता जणू तो आजच माझ्यासोबत शो साइन करणार आहे. मला आश्चर्य झालं की मी इतकं खराब ऑडिशन दिलं तरी मी कसा सिलेक्ट झालो. आधी तर मी विचार केला की हे लूक्समुळे असू शकतं. पण ते सगळं फेक होतं, खऱ्या शोसाठी कोणतं ही ऑडिशन होत नव्हतं."
अभिषेकनं पुढे सांगितलं की 'मी अशा स्थितीत होतो जिथे मला सतत आत्महत्या करण्याचा विचार येत होता. आता हे सगळं मी कोणाला सांगू हे मला कळत नव्हतं. मला वाटलं की लोकं मला जज करतील. मग मी माझ्या आईला फोन केला आणि तिला सगळं काही सांगितलं. मी जनरल डब्यात होतो, मी माझ्या आईला सगळं काही सांगितलं तर ती रडू लागली. तिनं मला लवकरात लवकर घरी परतण्यास सांगितलं. मग मी ट्रेनमध्ये असल्याचं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी घरी पोहोचेन.'