मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान त्याच्या कुटुंबासोबत वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. यासोबतच तो अनेकदा त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसमध्येही वेळ घालवतो. कोरोना काळात त्याने फार्म हाऊसवर बराच वेळ घालवला. त्याने त्याचं पनवेलचं फार्म हाऊस त्याची बहिण अर्पिताच्या नावावर ठेवलं आहे. तसं, सलमानकडे मुंबईत इतर अनेक मालमत्ता आहेत. आता सलमान खानने नुकतीच एक प्रॉपर्टी भाड्याने घेतली आहे.
एका रिपोर्टनुसार, एका रिअल इस्टेट पोर्टलच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे की, सलमान खानने वांद्रे येथील त्याच्या घराजवळील डुप्लेक्ससाठी भाड्याचा करार अंतिम केला आहे. हा डुप्लेक्स मकबा हाइट्स, वांद्रेच्या 17 व्या आणि 18 व्या मजल्यावर आहे. ज्याची मालकी बाबा सिद्दीकी आणि जीशान सिद्दीकी यांच्याकडे आहे. सलमान खानच्या बाबांचे सिद्दीकी यांच्यासोबत खूप चांगले संबंध आहेत.
अहवालानुसार, हा करार 11 महिन्यांसाठी करण्यात आला आहे. या ड्युप्लेक्समध्ये सगळ्या सुविधा आधीच आहेत. तिथे 2,265 चौरस फूट कार्पेट एरिआ आहे. असं सांगितलं जात आहे की, हे डुप्लेक्स रायटर पॅडसाठी वापरलं जाईल. यासाठी सलमान दर महिन्याला 8.25 लाख रुपये भाडे देईल.
अलीकडेच सलमान खानने त्याच्या आगामी 'अँटीम: द फायनल ट्रुथ' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट 26 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आयुष शर्मा मुख्य भूमिकेत आहे, तर सलमान एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 'मुळशी पॅटर्न' या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. बॉक्स ऑफिसवर जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते -2' या चित्रपटाशी या चित्रपटाची थेट स्पर्धा असेल.
याशिवाय सलमान खान 'टायगर 3' चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात तो पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत झळकणार आहे. नुकतंच चित्रपटाचं शूटिंग संपवून दोघंही परदेशातून परत आले आहेत. चित्रपटाच्या उर्वरित भागाचं चित्रीकरण लवकरच सुरू होईल. मनीष शर्मा 'टायगर 3' चं दिग्दर्शन करत आहे. अलीकडेच, सलमानने शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटातील कॅमिओचे शूटिंगही पूर्ण केलं आहे. तसं, सलमान खानकडे इतर अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. तो 'कभी ईद कभी दिवाळी' आणि 'किक 2' चित्रपटांमध्येही दिसणार आहे.