मुंबई : 'घर मोरे परदेसीया...' हे नवं गाणं सध्या बॉलिवूड विश्वात आणि प्रेक्षक वर्गात सर्वांचच लक्ष वेधत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, माधुरी दीक्षित आणि वरुण धवन यांच्यावर चित्रीत करण्या आलेलं हे गाणं कलंक चित्रपटाची उत्सुकता आणखीन वाढवत आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत गाण्यातील प्रत्येक दृश्य हे एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात आहे. 'कलंक'चं पहिलंच गाणं सोशल मीडियावर अवघ्या काही क्षणांमध्ये व्हायरल झालेलं पाहता चित्रपटातील पुढील गाण्यांविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचणार हे नाकारता येत नाही.
भव्य सेट, त्यात 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित आणि आलिया भट्टच्या अदांची जुगलबंदी घर मोहे परदेसीयाला चार चाँद लागले आहेत असंच म्हणावं लागत आहे. हे गाणं आणखी एका कारणामुळे खास ठरत आहे, ते म्हणजे अभिनेत्री आलिया भट्टच्या नृत्यामुळे. अमिताभ भट्टाचार्य लिखित आणि प्रितमने संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात विविध तालवाद्य आणि पट्टीच्या गायिकांच्या साथीने आलियाने या गाण्यावर सुरेख ठेका धरला आहे, जे पाहणं नृत्यप्रेमींसाठी परवणीच ठरत आहे.
विविध रंग, उत्सवाची झलक, देवदेवतांचा उल्लेख आणि भव्य सेटवर साकारण्यात आलेलं हे गाणं पाहताना क्षणार्धासाठी संजय लीला भन्साळी यांच्या कोणा एका चित्रपटातील दृश्य पाहत असल्याचाच भास होतो. पण, तसं नसून ही लक्षवेधी कलाकृती करण जोहरने साकारली आहे. त्यामुळे तगडी स्टारकास्ट, बहुप्रतिक्षित कथानक याचीच सांगड त्याने 'कलंक' या त्याच्या स्वप्नवत चित्रपटाच्या निमित्ताने घातली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.