मुंबई : बऱ्याच दिवसांपासून सुरु असणारं #MeToo चं वादळ काही शमण्याचं नाव घेत नाही आहे. कलाविश्वात याची बरीच चर्चा सुरु असून काही प्रसिद्ध चेहऱ्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आल्यामुळे सध्या अनेकांना धक्काच बसला आहे.
#MeToo च्या वादळाचा फटका आता आणखी एका अभिनेत्याला बसला आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हरिहरन हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेता अर्जुन सारजा याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
साधारण आठवडाभरानंतर श्रुतीने अर्जुनविरोधात शनिवारी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
'तक्रारकर्त्या श्रुती यांच्या सांगण्यावरुन आम्ही आरोपी (अभिनेता अर्जुन सारजा) विरोधात एफआयार दाखल करुन घेतली आहे. त्याच्यावर भारतीय दंडसंविधानातील काही कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार अभिनेत्री श्रुती यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने दाखल केली', अशी माहिती पोलिस उपायुक्त डी. देवराज यांनी माध्यमांना दिली.
२० ऑक्टोबरला श्रुतीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर लिहिलेल्या एका पोस्टमधून अर्जुनवर आरोप केले होते. २०१६ मध्ये एका कन्नड चित्रपटाच्या सेटवर त्याने आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला होता.
पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये श्रुतीने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१५ मध्ये घडलेल्या काही प्रसंगांचाही उल्लेख केला आहे.
तिने केलेले आरोप पाहता आता कायद्याच्या चौकटीत राहून या प्रकरणाचा तपास करण्यात येणार असल्याची माहितीही देवराज यांनी दिली.
अर्जुनविरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार पाहता आता पोलीस पथकाच्या तपासानंतर त्याच्यावर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.