Junior Mehmood Passes Away: हिंदी सिनेमा विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. जेष्ठ अभिनेते ज्यूनियर महमूद यांचं निधन झालं आहे. प्रदीर्घ काळापासून त्यांची तब्येत खालावली होती. अखेर वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कारवा, हाथी मेरे साथी, मेरा नाम जोकर हे त्यांचे सिनेमे फार गाजले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्युनियर महमूद दीर्घ काळापासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देत होते. गुरुवारी रात्री त्यांचं निधन झालं.
ई-टाईम्सच्या रिपोर्टनुसार, जेष्ठ अभिनेते ज्युनियर महमूद यांचं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची बातमी त्यांचे जवळचे मित्र समील काझी यांनी दिली आहे. ज्युनियर महमूद यांच्या जाण्याने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
अभिनेता जॉनी लिवर जेव्हा त्यांच्या भेटीला गेला, त्याचवेळी ज्युनियर महमूद यांच्या आजारपणाची बातमी समोर आली होती. जॉनी लिवरनंतर मास्टर राजू आणि जितेंग्र यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. याचसोबत मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांनीही त्यांची भेट घेतल्याचा फोटो व्हायरल झाला होता.
70-80 च्या दशकात आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या ज्युनियर मेहमूद यांनी चित्रपटसृष्टीत बराच काळ काम केलं. ज्युनियर मेहमूद यांनी देवानंद आणि राजेश खन्ना यांच्यापासून संजय दत्तपर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. ज्युनियर मेहमूद यांनी बाल कलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले.
केवळ अभिनयच नव्हे तर ज्युनियर महमूद यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनातही हात आजमावला होता. अनेक चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही शो मध्ये देखील त्यांनी काम केलं होतं.