Padma Awards 2025 : केंद्र सरकारने पद्म पुरस्कार 2025 जाहीर केले आहेत. देशातील अनेक दिग्गजांना यामध्ये सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राला 11 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्राचे मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज शनिवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मराठी कला क्षेत्रात अभिनेते अशोक सराफ यांनी उत्कृष्ट रित्या केलेल्या कामगिरीची नोंद सरकारने घेऊन त्यांना आता पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 139 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
दरम्यान, अच्युत रामचंद्र पालव, अरुंधती भट्टाचार्य, अश्विनी भिडे-देशपांडे, चैत्राम पवार, जसपिंदर नरुला, मारुती भुजंगराव चितमपल्ली, रणेंद्र मजुमदार, सुभाष खेतुलाल शर्मा, विलास डांगरे आणि वासुदेव कामथ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अशोक सराफ यांची प्रतिक्रिया
सर्वात प्रथम मी सर्वांना धन्यवाद देतो. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर जे तुम्ही कौतुक करत आहात त्यामुळे मला भरून येत आहे. जस-जसे पुरस्कार मिळत जातात तसा आनंद आणखी वाढत जातो. जस महाराष्ट्र भूषण झालं त्यानंतर आता पद्मश्री पुरस्कार झाला. जे तुम्ही काय करत आहात त्याची कुठेतरी नोंद होत असते. मला याचा खूप आनंद झाला आहे. इतक्या दिवसांपासून केलेल्या कामाचं सार्थक झाल्याचं वाटत आहे. मला पद्मश्री पुरस्कार भटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. याचा मला खूप आनंद आहे असं अशोक सराफ यांनी म्हटलं आहे.
याआधी अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. मुंबईतल्या वरळी येथील एनएससीआय डोममध्ये झालेल्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.