मुंबई : राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवणारा अभिनेता आयुषमान खुराना पुन्हा एकदा त्याच्या चित्रपटांची निवड किती वैविध्यपूर्ण आहे हे सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. बाला या त्याच्या आगामी चित्रपटातून हेच सिद्ध होत आहे. आयुषमान खुराना, भूमी पेडणेकर आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'बाला' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
कलाकारांचा अफलातून अभिनय आणि तितक्याच दमदार कथानकाची जोड मिळाल्यामुळे 'बाला'चा ट्रेलर पाहताना सुरुवातीपासूनच चेहऱ्यावर हास्य उमटत आहे. ऐन तारुण्यात केसगळतीचं प्रमाण वाढल्यामुळे टक्कल पडलेल्या एका युवकाची काय मनस्थिती होते आणि त्याला कोणकोणत्या प्रसंगांचा सामना करावा लागतो याचं चित्रण ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं.
केस गळण्याचं थांबावं यासाठी बाबा- बुवांकडचे उपाय म्हणू नका किंवा मग केसांचे रंग, प्रत्यारोपण म्हणू नका, प्रत्येक उपाय करुन पाहिल्यानंतर शेवटी अपयशाचाच सामना करणारा बाला साकारणारा आयुषमान पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकत आहे. चित्रपटात प्रासंगिक विनोदांचा जास्त भरणा असणार हे ट्रेलरमधुनच लक्षात येत आहे. प्रेमाच्या शोधात असणाऱ्या एका व्यक्तीला प्रेमाचं आणि हक्काचं जोडीदार मिळाल्यानंतर अवेळी पडलेलं टक्कल त्याच्या या वाटेत अडचणी कशा प्रकारे निर्माण होतात यावर चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आलं आहे.
अमर कौशिक दिग्दर्शित हा चित्रपट ७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हा आता दिनेश व्हिजन यांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाकडे फक्त आयुषमानच्या चाहत्यांचंच नव्हे, तर साऱ्या कलाविश्वाचं लक्ष लागलेलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.