मुंबई : कलाविश्वात प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला चाहत्यांचं प्रेम येतं, त्यासोबतच त्यांच्या वाट्याला काही असे प्रसंग येतात जे अनेकदा कलाकारांना चर्चेत आणतात. सध्या 'धडक' फेम अभिनेत्री जान्हवी कपूर अशाच एका कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली जात असून, त्यास कारण ठरतोय तो म्हणजे तिचा नवा लूक.
एका फोटोशूटसाठी जान्हवीने घोतलेला डिझायनर ड्रेस हा कोणा एका मोठ्या फॅशन ब्रँडच्याच ड्रेसप्रमाणे दिसत असल्याचं काही नेटकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं. ज्यानंतर दुसऱ्या ब्रँडच्या ड्रेसप्रमाणेच लूक करत तो ड्रेसही कॉपी केल्याच्या कारणाने तिची खिल्ली उडवण्यात आली. Balmain या ब्रँडच्या प्रसिद्ध holographic top या प्रकारच्या ड्रेसची नक्कल केल्याचं म्हणत त्यांनी जान्हवीची खिल्ली उडवली गेली.
काहींनी तिच्या फॅशन सेन्सवर टीका केली, तर काहींनी तिच्या बहिणींना म्हणजेच फॅशनिस्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनम कपूर आणि रिया कपूर यांनाही या प्रकरणात समाविष्ट करुन घेतलं. मुख्य म्हणजे जान्हवीने मात्र नेहमीप्रमाणे या साऱ्याकडे पाठ फिरवत दुर्लक्ष करणंच उत्तम समजलं. सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ही तिची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही जान्हवी अनेकदा सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवण्यात आली आहे. पण, ती मात्र नेहमीच या साऱ्यापासून दूर राहिली आहे.
सध्या जान्हवी आपल्या कारकिर्दीवर आणि कामावर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. येत्या काळात ती 'तख्त' या मल्टीस्टारर चित्रपटात झळकणार आहे. ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटासाठी तिने उर्दूचे धडे घेण्यास सुरुवात केल्याचं कळत आहे. त्याशिवाय भारतीय वायुदलातील महिला अधिकारी, गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणातही ती व्यग्र आहे.