मक्याच्या शेताआड अफूची लागवड, 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात अफूची शेती करणाऱ्या तीन शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 22, 2025, 06:19 PM IST
मक्याच्या शेताआड अफूची लागवड, 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime News : झटपट पैसा कमविण्यासाठी अनेक जण बेकायदेशीर मार्ग निवडत असतात. ज्यामध्ये काही शेतकरी अंमली पदार्थ वनस्पतींची विनापरवाना लागवड करून पैसा कमवत असतात. ज्यामध्ये ते शेतात विविध पिकांच्या नावाखाली अफू, गांजा अशा अंमली पदार्थांची लागवड करत असतात. असाच एक प्रकार आता पुणे जिल्ह्यात घडला आह. 

 पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात विनापरवाना अफूची बेकायदेशीरपणे शेती करण्यात आल्याच आढळून आलं आहे. काही शेतकऱ्यांनी समूह पद्धतीने आपल्या शेतामध्ये बंदी असलेली अफूची लागवड केली होती. गोपनीय बातमीदारांमार्फत याची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी थेट वालचंदनगर पोलिस आणि एलसीबीच्या पथकाने ज्या ठिकाणी अफूची शेती करण्यात आली आहे त्या ठिकाणी धाड टाकत कारवाई केली.

27 लाख 56 हजार 460 रूपये किंमतीचा माल जप्त

अफूची शेती न्हावी गावाच्या शिवारात मक्याच्या पिकात केली होती. पोलिसांनी कारवाई करत एकूण 27 लाख 56 हजार 460 रूपये किंमतीची सुमारे 883 किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफूची झाडे हस्तगत करून तीन व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. रतन कुंडलिक मारकड, बाळू बाबुराव जाधव आणि कल्याण बाबुराव जाधव अशी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. या तिघांविरोधात वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

या शेतकऱ्यांनी अफूची लागवड दिसून येऊ नये यासाठी शेतात कांदा आणि लसून पिकांची लागवड केली होती. तर अफूच्या बाजूने मकाचे उत्पादन घेतले होते. 21 फेब्रुवारी रोजी वालचंदनगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार स्वप्निल अहिवळे यांना अफूच्या शेतीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या परवानगीने ज्या ठिकाणी अफूची शेती करण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.