महाराष्ट्रातील एकमेव स्मारक ज्याचं काम 40 वर्षांपासून रखडलयं; राज्यकर्त्यांकडून शंभूराजांच्या स्मारकाची अवहेलना

रखडलेलं स्मारक तातडीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय. तर  सरकार संभाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल संवेदनशील नाही.स्मारक उभारण्याच्या दृष्टीने तातडीने पावले टाकली नाही तर आंदोलन करू असा इशारा शिवसेना UBTचे माजी आमदार वैभव नाईक यांनी  दिला आहे.

वनिता कांबळे | Updated: Feb 22, 2025, 05:40 PM IST
 महाराष्ट्रातील एकमेव स्मारक ज्याचं काम 40 वर्षांपासून रखडलयं; राज्यकर्त्यांकडून शंभूराजांच्या स्मारकाची अवहेलना

Chatrapati Sambhaji Maharaj Smarak : छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरच्या ज्या कसबा गावात अटक झाली त्या गावात उभारण्यात आलेल्या स्मारकाचं काम गेल्या 40 वर्षांपासून रखडलंय. 1986 साली भूमिपूजन झालेल्या स्मारकाचं काम वर्षानुवर्ष रखडलं. उद्घाटनावेळी राजकीय नेत्यांनी भव्यदिव्य स्मारक उभारण्याचं स्वप्नं दाखवलं. पण ते स्मारक पूर्ण कधी झालंच नाही. जवळपास 40 वर्षानंतर स्मारकाची वास्तू अगदी जीर्ण झालीये. या स्मारकावर जवळपास 80 लाख रुपये खर्च झाले. पण त्या कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. रखडलेलं स्मारक पाहून शिवप्रेमींना वेदना होतायेत. 

छत्रपती संभाजी राजांचे नांव ऐकून शत्रूचा देखील थरकाप व्हायचा. संभाजी राजे म्हणजे , अतुलनीय धाडस , पराक्रम आणि न्यायाचे प्रतिक ! अशा राजाच्या पदरी त्यांच्या वधानंतरही असणारे दुर्दैवाचे फेरे संपत नाहीत ही इतिहासा पेक्षा वास्तवातील मोठी शोकांतिका ठरत आहे. राजांना संगमेश्वरच्या भूमित दगाबाजीने बेसावध असतांना शत्रूने पकडले. या भूमीवर हा दुर्दैवी डाग कायम असतांना आता त्यांच्या स्मारक दुरावस्थेमुळे संभाजी प्रेमींसह पर्यटकांनी देखील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजी राजे स्मारक समिती या भव्यदिव्य योजनेत पूर्णपणे अपयशी ठरली असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. 

संगमेश्वरला फार मोठे ऐतिहासिक महत्व प्राप्त आहे. शिल्पकलेचा अद्वितीय आविष्कार असलेली पुरातन मंदीरे, गड – किल्ले आणि ब्रिटिश कालीन वास्तू याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे या भागात असणारे वास्तव्य यामुळे देश विदेशातील पर्यटक संगमेश्वरला भेट देत असतात. छत्रपती संभाजी राजांना कसबा – संगमेश्वर येथे दगाबाजीने पकडल्यामुळे त्यांची आठवण म्हणून त्यांचे स्मारक उभारण्याची योजना आखण्यात आली. 11 मार्च 1986 साली संगमेश्वर जाखमाता मंदीराजवळ भव्यदिव्य असा स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. हा सोहळा आणि उपस्थित मान्यवरां मधील उत्साह पाहून प्रत्येक संभाजी प्रेमीला असे वाटले की , हे स्मारक एक ते दोन वर्षात पूर्णत्वास जाईल. 

इतिहासातील काही गोष्टी जशा शापित आहेत तसेच या स्मारकाच्या बाबतीत घडणार आहे याची संभाजी प्रेमींना काय कल्पना ? स्मारकाच्या उभारणीची सुरुवात जोमाने झाली मात्र त्यानंतर सुरु झालेले स्मारकाच्या दुर्दैवाचे फेरे आज 29 वर्षात 80  लाख रुपये खर्च होवूनही कायम आहेत. हे स्मारक पूर्ण होवून कार्यरत होण्यासाठी अनेक आंदोलने , विनंत्या आणि बैठका घेण्यात आल्या. अनेक संघटना आणि मान्यवरांनी भेटी देवून गर्भित इशारेही दिले, मात्र यातील एकाही चळवळीचा परिणाम कोणावर झाला नाही. बांधकाम विभागाने निकृष्ट पध्दतीने काम झालेले स्मारक हस्तांतरित करुन पुढील जबाबदारी स्मारक समितीवर सोपवली. स्मारक समितीकडे कोणताही ठोस कार्यक्रम नसल्याने हे स्मारक गेल्या पाच वर्षात कार्यरत होवू शकलेले नाही. 

सद्यस्थितीत स्मारकाला जाळ्या आणि वेलींनी पूर्णपणे वेढले आहे. दरवाजे मोडले असून , काचा फोडण्यात आलेल्या आहेत , पायऱ्या मोडल्या असून स्ट्रीट लाईट फोडून टाकण्यात आलेत.  सुरक्षा रक्षकासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीची पूर्णतः दुरवस्था झाली असून याचे दरवाजे मोडून यामध्ये गैरप्रकार केले जात आहेत. स्मारकाचे गेट मोडले असून सध्या या स्मारकाचा वापर एक ' आडोसा ' म्हणून केला जात असल्याचे पाहायला मिळतेय. स्मारकात सध्या मद्यपी मंडळींचे कायम स्वरुपी वास्तव्य असल्याचे तेथे असलेल्या सामानावरुन स्पष्ट होत आहे.

छत्रपती संभाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. या अस्मितेच्या नशीबी अपूर्ण स्मारकाच्या रुपाने आलेले दुर्दैव हे सहन करण्यापलिकडील आहे . व्यक्तीश: मी या स्मारकाची स्वखर्चाने अनेकदा साफसफाई केली , येथे बलिदान दिनही साजरा केला मात्र आता स्मारक हे समितीच्या ताब्यात असल्याने देखभालीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. स्मारक समितीच्या दुर्लक्षामुळे आज स्मारक अखेरच्या घटका मोजत आहे. स्मारकाची झालेली दुरावस्था आणि येथे होणारे गैरव्यवहार लक्षात घेता समितीने आमची अस्मिता असणाऱ्या संभाजी राजांचे स्मारकाला दिलेलं नांव बदलावं आणि ही इमारत सरकार जमा करावी अशी मागणी संभाजी प्रेमी परशुराम पवार यांनी केली आहे.