Sanket Korlekar Sister Uma Korlekar Serial : मराठी सिनेसृष्टीत सध्या अनेक कलाकार हे नावारुपाला येत असल्याचे दिसत आहे. छोट्या पडद्यावरील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा' या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे संकेत कोर्लेकर. त्याने या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. त्यासोबतच तो स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'अजूनही बरसात आहे' या सारख्या प्रसिद्ध मालिकेतही झळकला. आता संकेत पाठोपाठ त्याची बहीण उमानेही सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.
संकेत कोर्लेकर आणि त्याची बहीण उमा कोर्लेकर हे सोशल मीडियावर सतत रील्स करताना दिसतात. संकेत आणि उमा यांची भावा बहिणीची जोडी लोकप्रिय आहे. ते दोघेही वेगवेगळ्या विषयावर मजेशीर रील्स करत असतात. संकेतची बहिण उमा कोर्लेकरने नुकतंच मराठी मालिकाविश्वात पदार्पण केले आहे. स्टार प्रवाहवरील 'साधी माणसं' या मालिकेत एका छोट्याशा भूमिकेत ती झळकली. यानिमित्ताने संकेतने त्याच्या बहिणीसाठी खास पोस्ट केली आहे.
"उमा तू पहिल्यांदा TV वर दिसलीस आणि नेमकं मी तिथे तुला बघायला नाही आहे पण आनंद ह्याच गोष्टीचा आहे की तुझ्या स्वप्नांना उशिरा का होईना पण सुरुवात झाली. स्वतःच्या जीवावर माझीही मदत न घेता ही लहानशी भूमिका मिळवलीस. तुझा उत्तम अभिनय लवकरच योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि तुला अजुन छान भूमिका मिळेल. ज्यातून तुला तुझं खरं पोटॅनशियल लोकांना दाखवता येईल. आज चित्रपटसृष्टीत माझं १२ वं वर्ष सुरु आहे ह्या हक्काने तुला सांगेन की उतू नको मातू नको हातातलं काम अर्ध्यात सोडू नको. खूप शुभेच्छा.. माझी मैत्रीण मानसीला खूप प्रेम, कारण १० दिवस तिने उमाची खूप काळजी घेतली. त्यात माझा मित्र आकाश नलावडेचे देखिल कौतुक की सेट वर त्याने उमाची पुरेपूर काळजी घेतली. खूप खूप प्रेम", असे संकेत कोर्लेकरने म्हटले आहे.
संकेतच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. यावर अनेकांनी खूप खूप अभिनंदन, छान काम केलंस तू, खूपच सुंदर, अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.
दरम्यान संकेतच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा' या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'अजूनही बरसात आहे' या मालिकेतही तो झळकला. त्यासोबतच 'टकाटक', 'आय पी एस' सारख्या चित्रपटातही त्याने काम केले आहे. तसेच 'शिवबा', 'मराठी पाऊल पडले पुढे' या नाटकांमध्येही त्याने काम केले आहे.