मुंबई : गेल्या काही वर्षांपासून सिने इंडस्ट्रीत मोठा बदल घडून आला आहे. स्टार्स त्यांच्यासोबत होणारा भेदभाव आणि चुकीच्या वागणूकीवर खुलेपणाने बोलू लागले आहेत. सुरुवातीला अभिनेत्री त्यांच्यासोबतचे घडलेला वाईट गोष्टींवर मोकळेपणाने बोलणं टाळत होत्या. मात्र आता इंडस्ट्रीत होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर चर्चा होताना पाहायला मिळते. आता अभिनेत्री उघडपणे आपली बाजू मांडताना दिसतात. लैंगिक शोषणापासून ते मिळालेल्या चुकीच्या वागणूकवर फिमेल स्टार्स न घाबरता बोलत आहेत.
अलीकडेच, राष्ट्रीय पुरस्कार विजेती डॉक्यूमेंटरी फिल्ममेकर आणि लेखिका त्रिशा दास यांनी त्याच्यासोबत घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. त्रिशाने सांगितले की, ती बर्याचदा लैंगिक अत्याचाराची शिकार झाली आहे. पण त्यावेळी सोशल मीडिया इतका अॅक्टीव्ह नव्हता. आता स्टार्स सोशल मीडियाद्वारे आपली बाजू स्पष्टपणे मांडू शकतात.
ना सोशल मीडियाचं युग होतं, ना कुठलीही मीटू मोहिम
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्रिशा म्हणाली, " 2016 मध्ये मी ' Ms Draupadi Kuru: After the Pandavas' हे पुस्तक लिहिलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत बरेच बदल घडले आहेत. आता लोक लैंगिक समानतेबद्दल, समाजात होत असलेल्या अन्यायाविषयी खुलेपणाने बोलत आहेत. जिथे कामाच्या ठिकाणी लिंग असमानता असायची तिथे आता MeToo सारखी मोहिम सुरू झाली आहे.
जुन्या दिवसांबद्दल बोलताना त्रिशा म्हणाली, जेव्हा मी एक डॉक्युमेंटरी फिल्ममेकर म्हणून काम करत होतो, तेव्हा माझ्यावर बर्याचदा लैंगिक अत्याचार झाले. पण कामाच्या ठिकाणी हे सामान्य होतं. तेव्हा असा कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नव्हता जिथे आम्ही आमची स्टोरी सांगू शकू, स्पष्टपणे बोलू शकू"
त्यामुळे शांत राहून शोषणाचा बळी होणं ही खूपच सामान्य गोष्ट होती.
पुरुषांमध्ये कोणतीही भीती नव्हती. पण आता सोशल मीडिया आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचारावर आवाज उठवणे यांसारखे बदल घडून आले आहेत. MeToo सारख्या चळवळीने बरेच बदल घडवून आणले आहेत. कारण ही चळवळ महिला सक्षमीकरणासाठी आहे.