Jalna Crime News: जालन्यातील भोकरदनमधील राजपूत रुग्णालयात 8 महिन्यांपूर्वी पोलीस आणि आरोग्य विभागानं संयुक्त धाड टाकली आणि डॉ.राजपूत यांच्या अवैध गर्भपात केंद्राचा भांडाफोड केला. जसजसा या प्रकरणाचा तपास पुढे जाईल तसा आरोपींची संख्या वाढू लागलीय.
जालना, बुलडाणा जिल्ह्यात 24 गर्भपात झालेत. गर्भपात प्रकरणात एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 13 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुख्य आरोपी डॉ.दिलीपसिंग राजपूत न्यायालयीन कोठडीत आहे. 12 आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. तर, दोन फरार आहेत. जालना,बुलडाणा, छ. संभाजीनगरातील 10 डॉक्टर, एक घरमालक, 2 एजंटसह 2 सहाय्यक आरोपी अजून मोकाट आहेत.
आरोपींपैकी 8 एमबीबीएस, 2 एमडी डॉक्टर आहेत.
जालना पोलिसांनी याच अवैध गर्भपात प्रकरणात बुलडाण्यातील एका आरोपी डॉक्टरला अटक केलीय. त्याच्या संपर्कात अनेक डॉक्टर असल्याचं सांगितल जातंय. विशेष म्हणजे गर्भपात केल्यानंतर भ्रूण संबंधित महिलकडेच दिलं जायचं. तर गर्भपातासाठी आलेल्या महिलांच्या अर्धवट नोंदी घेऊन गर्भपात केले जायचे. दरम्यान या प्रकरणात आणखी आरोपी वाढू शकतात.
जालन्यातील भोकरदन अवैध गर्भपात प्रकरणाचा आवाका आता वाढत चाललाय. आणखी 15 आरोपींवर अटकेची टांगती तलवार आहे. आतापर्यंत 3 जिल्ह्यात गर्भपाताचं हे रॅकेट सुरु होतं. या रॅकेटमध्ये अजून कुणाकुणाचा सहभाग पुढे येतो हे बघावं लागेल. मात्र भृणहत्येचं महापातक करणाऱ्यांना तातडीनं अटक होऊन कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. तरच अशा प्रकारांना आळा बसेल.