मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिला बांगलादेश सरकारने झटका दिलाय. जगातील अनेक देशांमध्ये सध्या मंदीचे सावट आहे. पैसा वाचवण्यासाठी या देशांची सरकारे प्रयत्न करत आहेत. गरज नसलेल्या गोष्टी टाळल्या जात आहेत. त्यामुळे बांगलादेश सरकारने पैसे वाचवण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या डान्स कार्यक्रमावर (Nora Fatehi Dance Program) बंदी घातली आहे. नोरा फतेही बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका कार्यक्रमात परफॉर्म करणार होती, ज्यासाठी सरकारने परवानगी नाकारली आहे.
बांगलादेश सरकारकडून (Bangladesh Government) सध्या काटकसर सुरु आहे. डॉलरच्या किंमतीत वाढ होत असताना सरकारपुढे अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे बांगलादेशच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी नोटीस जारी करत म्हटले की, जागतिक परिस्थिती लक्षात घेता आणि परकीय चलन साठा राखण्याच्या उद्देशाने नोरा फतेहीला (Nora Fatehi Program) परवानगी देण्यात आली नाही. नोरा 18 नोव्हेंबर रोजी ढाका येथील वुमेन्स लीडरशिप कॉर्पोरेशनच्या कार्यक्रमात परफॉर्म करणार होती आणि पुरस्कार सादर करण्यासाठी येणार होती.
परकीय चलनाचा साठा कमी होत असताना केंद्रीय बँकेने डॉलर पेमेंटवर घातलेल्या निर्बंधांचा उल्लेख मंत्रालयाने केला आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत 36.33 अब्ज डॉलरवर घसरला आहे. जवळपास चार महिन्यांची आयात कव्हर करण्यासाठी हे पुरेसे आहे. एका वर्षापूर्वी ते $46.13 अब्ज होते. नोरा फतेही मोरोक्कन-कॅनडियन कुटुंबातून आली आहे. तिने 2014 मध्ये हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले.
IMF मधील आशिया आणि पॅसिफिक विभागाच्या उपसंचालक अॅन-मेरी गुल्डे-वुल्फ यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या महिन्याच्या अखेरीस बांगलादेशला आपले पहिले वाटाघाटी मिशन पाठविण्याची तयारी करत आहे, जेणेकरून बांगलादेशने मागितलेले कर्ज मिळवण्यास मदत होईल. देशाचा परकीय चलनाचा साठा सध्या चांगल्या पातळीवर आहे, पण खाली जात आहे. IMF एक आर्थिक कार्यक्रम आयोजित करण्यावर चर्चा करत आहे ज्यामध्ये अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी आणि मंदी टाळण्यासाठी उपायांचा समावेश असेल.