मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny deol) आज 64 वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रपटांव्यतिरिक्त सनी देओल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिलाय. सनी देओल आणि डिंपल कपाडिया (Sunny Deol and Dimple Love story) यांच्या अफेअरची चर्चा एकेकाळी जोरात सुरु होती. एक काळ असा होता जेव्हा विवाहित असताना ही सनी देओलचं मन डिंपलकडे होते. दोघांचेही एकमेकांवर जिवापाड प्रेम होते. मात्र, दोघांनीही कधीचं त्यांचं नातं उघडपणे जाहीर केले नाही. (Sunny Deol affair with Dimple Kapadia)
काही वर्षांपूर्वी लंडनमधील बस स्टॉपवर दोघे एकमेकांचा हात धरुन बसले असतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांच्या भूवया उंचावल्या होत्या. सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांनी 'मंझिल-मंझिल' हा 1984 मध्ये पहिला चित्रपट केला होता. या चित्रपटादरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. सनी आणि डिंपलचेही लग्न झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र या लग्नाचा कोणताही पुरावा नव्हता. दोघांच्या लग्नाची मीडियामध्ये बरीच चर्चा झाली होती. त्यांचे नाते सुमारे 11 वर्षे होते.
डिंपलशिवाय सनीचे नाव अमृता सिंगसोबतही जोडले गेले होते. सनीचा पहिला चित्रपट 'बेताब' होता, ज्यामध्ये त्याच्यासोबत अमृता सिंहने काम केले होते. दोघांच्या कामाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट हिट ठरला. शूटिंगदरम्यान अमृताचं सनी देओलवर प्रेम जडले. या चित्रपटात दोघांचे काही इंटिमेट सीन्स शूट करण्यात आले आहेत. त्यावेळी असे इंटिमेट सीन्स शूट करणं ही मोठी गोष्ट होती. ही दृश्ये पडद्यावर चित्रित केल्याने खऱ्या आयुष्यातही दोघांमधील जवळीक वाढू लागली.
फिल्मीबीट वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, अमृता सिंगची आई सनी आणि अमृता यांच्या नात्याच्या विरोधात होती. रिपोर्टनुसार, अमृताच्या आईने सनी देओलच्या कुटुंबाची चौकशी सुरू केली. यानंतर जे हकिकत समोर आले ते जाणून ती थक्क झाली. सनी देओल लंडनमधील पूजा नावाच्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे अमृताच्या आईला कळते. एवढेच नाही तर सनीने पूजासोबत इंग्लंडमध्ये लग्न केले होते.
एकीकडे सनीचे संपूर्ण सत्य अमृताच्या समोर आले होते. दुसरीकडे, पूजाला पतीच्या अफेअरबद्दल काहीच कल्पना नव्हती. या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, देओल कुटुंब सनी देओलचे लग्न गुप्त ठेवू इच्छित होते. कारण त्याची कारकीर्द नुकतीच सुरू झाली होती. त्यावेळी एखाद्या अभिनेत्याचे लग्न झाले की त्याची कारकीर्द संपली असे मानले जायचे. सनी आपल्या लग्नाला सतत नकार देत होता. तोपर्यंत सनी आणि अमृताचे नाते पूर्णपणे संपले होते. सनी देओल आणि पूजा देओल 1984 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. दोघांना करण देओल आणि राजवीर देओल ही दोन मुले आहेत.