Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू झाली. काँग्रेसच्या पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाचे वारे वाहायला सुरूवात झाली. त्यातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी निकालानंतर काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केली होती.
तर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्यातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेस हायकमांडकडे राजीनामा देणार असल्याची चर्चा राज्यात सुरू झाली. नाना पटोले यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे या चर्चेचा जोर वाढल्याचं पाहायला मिळालं. मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पटोलेंच्या राजीनाम्या संदर्भात माहिती नसल्याचं म्हटलंय.
दरम्यान काँग्रेस हायकमांडच्या अतितातडिच्या आदेशानंतर अमित देशमुख तातडीने मुंबईकडे रवाना झालेत. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अमित देशमुख यांकडे येण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय. दुसरीकडं नाना पटोले मात्र राजीनाम्याच्या बातम्यांना पुर्णविराम दिलाय. आपण राजीनामा दिला नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय.
तर काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाच्या सुरू असलेल्या चर्चेत भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांनी उडी घेत नाना पटोले यांना टोला लगावलाय. विजयाचे वाटेकरी अनेक असतात मात्र पराभव अनाथ असतो असं म्हटलं जातं. तशीच काहीशी परिस्थिती काँग्रेसची झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे काँग्रेस हायकमांड नेमका काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
विधानसभेचा निकाल लागताच अशोक चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केलाय. ज्यांनी त्रास दिलाय ते सगळे साफ झाले. लातूरमध्ये एक पडला दुसरा तर दुसरा निसटता निसटता जिंकला, अशा शब्दांत त्यांनी देशमुख बंधूंवर टीका केलीय. तर पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात सगळे साफ झाले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पराभव होतं होता. मात्र थोडक्यात जिंकले, असा निशाणा पटोलेंवर साधलाय.