'द केरळ स्टोरी' चित्रपट मुस्लिमांच्या विरोधात आहे का? निर्मात्यांचा मोठा दावा

द केरला स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्याला भर चौकात फाशी द्या अशी संतप्त भावना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली होती. तर, सडक्या मेंदूत येणा-या सडक्या विचारांना फाशी देण्याची गरज अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  चित्रपट पाहिल्यानंतर व्यक्त केली. 

वनिता कांबळे | Updated: May 10, 2023, 11:31 PM IST
 'द केरळ स्टोरी' चित्रपट मुस्लिमांच्या विरोधात  आहे का? निर्मात्यांचा मोठा दावा title=

The Kerala Story:  द काश्मीर फाईल्स'नंतर 'द केरला स्टोरी' या चित्रपटामुळे वाद निर्माण झाला आहे.  द केरला स्टोरी हा सिनेमा रिलीज झाला आणि त्यावरुन वाद, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. केरळच्या या कथेचा देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात या सिनेमाला विरोध होत आहे. 'द केरळ स्टोरी' मुस्लिमांच्या विरोधात असल्याचा आरोप केला जात आहे. या चित्रपटाच्या  क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि प्रोड्यूसर विपुल अमृतलाल शाह यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

सिनेमा सत्यकथेवर आधारित असल्याचा दावा 

द केरला स्टोरी. चित्रपट सध्या देशात, चित्रपटगृहांत, वादांमध्ये, चर्चांमध्ये नुसता धुमाकूळ घालतोय. धर्म, लव्ह जिहाद, दहशतवाद, राजकारण आणि मसाला असा हा चित्रपटाचा कॉम्बोपॅक आहे.  हा सिनेमा सत्यकथेवर आधारित असल्याचा दावा केला जात आहे. केरळमध्ये हजारो मुलींचं धर्मांतर करण्यात आलंय आणि त्यांना इसिसमध्ये ट्रेनिंग देऊन दहशतवादी केलं जातंय, असं चित्रपटाचं कथानक आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधीपासूनच वादात सापडला होता.

हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आणि चित्रपट रिलीज होण्याचा मार्ग मोकळा झाला.  केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेच्या कारणावरुन या सिनेमावर बंदी घालण्यात आली.  हा चित्रपट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रपोगांडा असल्याचा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केला होता.  

सिनेमात दाखवल्यानुसार केरळमधल्या 32 हजार मुलींचं जबरदस्तीनं धर्मांतर करण्यात आलं हे सिद्ध करा आणि 1 कोटी घ्या असं आव्हान काँग्रेस नेते शशी थरुर यांनी दिले होते.  तर सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि निर्माता विपूल शाह मात्र 32 हजार मुलींचं जबरदस्तीनं धर्मांतर झाल्याच्या दाव्यावर ठाम आहेत.

'द केरळ स्टोरी' मुस्लिमांच्या विरोधात आहे का? 

 'द केरळ स्टोरी' मुस्लिमांच्या विरोधात असल्याची देखील चर्चा आहे. चित्रपट मुस्लिम किंवा इस्लामच्या विरोधात नाही. तसेच हा चित्रपट कोणत्याही विशिष्ट धर्माच्या किंवा जातीच्या विरोधात नाही.  हा चित्रपट दहशतवादाच्या विरोधात असल्याचे निर्माता विपूल शाह यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात या सिनेमावरुन वेगळाच वाद

महाराष्ट्रात या सिनेमावरुन वेगळाच वाद झाला. दिग्दर्शक केदार शिंदेंनी यासंदर्भात एक ट्विट करुन नव्या वादाला तोंड फोडले.
'दुर्दैव... महाराष्ट्रात 'केरला स्टोरी' या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवत आहेत. या महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र शाहीर' प्रदर्शित झाला हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण हे तरी माहिती असेल का?, असं ट्विट केदार शिंदे यांनी केले होते. 'द केरला स्टोरी' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमावतोय... धर्माशी संदर्भात सिनेमा आल्यावर भारतामध्ये वाद नवा नाही.... आता द केरळा स्टोरीचा वाद कुठपर्यंत पसरतोय, हे पाहावं लागेल.