मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुपरस्टार आमिर खानने आज किरण रावबरोबर घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना चकित केले आहे. तशी किरण ही आमिरची दुसरी पत्नी होती. या दोघांचीही लव्ह स्टोरी खूप रंजक होती, त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात ही एका फोन कॉलने झाली. परंतु त्या आधी, आमिर आणि किरणची पहिली भेट 2001 मध्ये 'लगान' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात किरण सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती.
आमिरने 1986 मध्ये रीना दत्ताशी लग्न केले होते. आमिर जेव्हा किरणला भेटला तेव्हा देखील तो रीनाबरोबर होता. आमिरने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, रीनासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याचे आणि किरणचे अफेअर सुरु झाले.
आमिर त्याच्या आयुष्यातील कठीण दिवसातून जात होता. तेव्हा एक दिवस त्याला किरणचा फोन आला आणि दोघांनी सुमारे 30 मिनिटे फोनवर चर्चा केली. किरणच्या त्या 30 मिनिटांच्या कॉलनंतर आमिरला खूप छान वाटत होते. त्यानंतर आमिरने उर्वरित आयुष्य किरणबरोबर घालवण्याचा निर्णय घेतला.
आमिर एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला स्ट्राँग महिला आवडतात. त्यांची पहिली पत्नी रीना दत्ताही खूप स्ट्राँग महिला आहे. त्याच्याप्रमाणे किरणसुद्धा खूप स्ट्राँग आणि कर्तृत्ववान महिला आहे. परंतु असे असले तरी आमिरचे दोन्ही लग्न टिकले नाहीत.
आमिर आणि किरणने 28 डिसेंबर 2005 रोजी एकमेकांशी लग्न केले होते. यानंतर त्यांचा मुलगा आझादचा जन्म सरोगेसीच्या माध्यमातून 2011 मध्ये झाला होता. आता घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण एकत्र आपल्या मुलाचे संगोपन करणार आहेत.
लग्नाच्या या 15 वर्षांमध्ये दोघांनीही प्रत्येक चांगला आणि वाईट क्षण एकत्र घालवला आहे आणि प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना त्यांनी एकत्रीत पद्धतीने केला आहे.
किरण राव ही एका राज घराण्यातील मुलगी आहे. तिचे आजोबा जे. रामेश्वर राव तेलंगणातील वानप्रार्थी शहराचे राजा होते. परंतु किरणने चित्रपटसृष्टीत तिच्या कारकिर्दीचा शोध घेतला. आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowarikar) यांच्या सोबत किरणने सहाय्यक दिग्दर्शक करत आमिर खानच्या 'लगान' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तिने ‘धोबी घाट’ या चित्रपटात दिग्दर्शक म्हणून एक नवीन प्रवास सुरू केला. आज किरण एक यशस्वी निर्माता-दिग्दर्शक आहे.