मुंबई : कला विश्वात रोज नव्याने उदयास येणाऱ्या संकल्पनांचा चित्रपटांमध्ये अवलंब केला जातोच. पण, त्याचा सर्वाधिक प्रभावी वापर होतो तो म्हणजे वेब सीरिजमध्ये. प्रयोगशीलतेच्या साथीने नवनवीन प्रयोग करणाऱ्या वेब सीरिजच्या या दुनियेत आता आणखी एका नव्या कथानकाचा प्रवेश झाला आहे. 'मिर्झापूर'मागोमाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालेली ती वेब सीरिज आहे 'मेड इन हेव्हन'. Amazon Prime च्या या नव्या वेब सीरिजचा ट्रेलर आणि त्यातील कलाकारांचे पोस्टर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले.
सोशल मीडियावर 'मेड इन हेव्हन'चा ट्रेलर सध्या गाजतोय तो म्हणजे त्याच्या कथानकासाठी. रिमा कागती आणि झोया अख्तरच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या वेब सीरिजचं दिग्दर्शन खुदद् झोया अख्तर, नित्या मेहरास, प्रशांत नायर आणि अलंकृता श्रीवास्तव यांनी केलं आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर पाहता लग्न या एका विषयाभोवती फिरणाऱ्या समजुती आणि संकल्पनांवर 'मेड इन हेव्हन'मधून भाष्य करण्यात येणार असल्याचं कळत आहे.
ट्रेलरमधील काही वाक्य सध्याच्या आयुष्याशी सहजपणे जोडता येतात. लग्नाच्या गाठी या स्वर्गातून बांधलेल्या असतात असं म्हणतात. पण, खरी वस्तूस्थिती मात्र वेगळीच असते जी या वेब सीरिजमधून मांडण्यात आली आहे. मोठ्या घरांमध्ये होणारे दिमाखदार विवाहसोहळे आणि समाजातील उच्चभ्रू वर्गाच्या लग्नाविषयीच्या अपेक्षा या साऱ्या गोष्टी एका धाग्यात बांधत ही सीरिज साकारण्य़ात आली आहे.
शोभिता धुलिपाला, अर्जुन माथूर, जिम सर्भ, कल्की कोचलीन, शशारं अरोरा, शिवानी रघुवंशी हे चेहरे 'मेड इन...'च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काहीशी बोल्ड पण, तितकीच वास्तवदर्शी अशी ही वेब सीरिज ८ मार्चपासून प्रदर्शित केली जाणार आहे. त्यामुळे आता इतर वेब सीरिजच्या शर्यतीत आपलं वेगळेपम सिद्ध करत 'मेड इन....' यशस्वी ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.