Innovation City In Maharashtra : गुजरातच्या इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी अर्थात GIFT City प्रमाणेच महाराष्ट्रात इनोवेशन सिटी (Innovation City) उभारली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली आहे. राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात गुजरात प्रमाणेच Innovation City उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गुजरातची गिफ्ट सिटी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे. गुजरातच्या गिफ्ट सिटीच्या धर्तीवर महाराष्ट्रातील इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. स्टार्टअप इंडियाला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ही घोषणा केली. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे
स्टार्टअप्स आणि उद्योगांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी फिनटेक धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्राला फक्त देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे स्टार्टअपचे केंद्र बनवायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. नवीन स्टार्टअप धोरणाचा मसुदा तयार करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लोकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
100 कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) सोबत सामंजस्य करारचीही घोषणा देकील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात केली. गुंतवणूक आणि मूल्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे, त्यामुळे स्टार्टअप कॅपिटल अशी नवी ओळखही मुंबईला मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारने सुरक्षा क्षेत्रासाठी फंड ऑफ फंड्स निर्माण केला आहे. या क्षेत्रात काम करणारे 300 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सना राज्याच्या फंड ऑफ फंड्सद्वारे निधी देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे एआय केद्रांमध्ये रूपांतर करण्याच्या योजनेची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. जागतिक दर्जाचे एआय आणि स्टार्ट-अप इकोसिस्टम तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत भागीदारी करण्याचे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी अनेक कंपन्यांना केले.