Goa Paragliding Accident : गोवा हे देशभरातील पर्यटकांचे आवडते टूरीस्ट डेस्टिनेशन आहे. समुद्र किनाऱ्यांची सैर करताना पर्यटक येथे साहसी खेळांचा थरारक अनुभव देखील घेतात. हाच थरारक अनुभव एका तरुणीच्या जीवावर बेतला आहे. गोव्यामध्ये पॅराग्लायडिंग करताना महिला पर्यटकासह धक्कादायक प्रकार घडला. हवेत उडणाऱ्या पॅराशूटचा दोर तुटून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत पुण्यातील तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
या विचित्र दुर्घटनेत पुण्यातील 27 वर्षीय शिवानी दाबले आणि 26 वर्षीय नेपाळी पायलट सुमन नेपाळी या दोघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर गोवा पोलिसांनी पॅराग्लायडिंग कंपनीचा मालक शेखर रायजादा याला अटक केली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे.
शिवानी आपल्या मित्रासह गोव्यात फिरण्यासाठी आली होती. 18 जानेवारी रोजी ती परनेम केरी येथील क्री पठार परिसरात पॅराग्लायडिंग करण्यासाठी गेली. पठारावरुन शिवानीच्या पॅराशूटने हवेत झेप घेतली. यावेळी तिच्यासह पायलट सुमन नेपाळी देखील होता. थोडावेळ उंच हवेत घिरक्या घेतल्यानतर शिवानीच्या पॅराशुटचा दोर तुटला. शिवानीचे पॅराशमुट थेट एका दगडावर कोसळले. यात शिवानीसह तिच्यासोबत असलेला पायलट सुमन नेपाळी यांना गंभीर दुखापत झाली. थोड्याच वेळात दोघांचा मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने तातडी यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले.
दरम्यान स्थानिकांनी येथील पॅराग्लायडिंग बंद करण्याची मागणी केली आहे. येथे पॅराग्लायडिंग करताना कोणत्याही प्रकारची खबरदारी तसेच सुरक्षा घेतली जात नाही. यामुळे हा साहसी खेळ पर्यटकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.