7 कोटी PF धारकांसाठी आनंदाची बातमी! किती मिळणार व्याज? शेअर बाजाराचा होणार असा परिणाम

PF Fixed Rate: सात कोटी पीएफ खातेधारकांना निश्चित व्याज देण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. याचा अर्थ असा आहे की, भविष्यात शेअर बाजारातील चढउतारांचा पीएफच्या व्याजदरावर परिणाम होणार नाही.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 18, 2025, 09:52 AM IST
7 कोटी PF धारकांसाठी आनंदाची बातमी! किती मिळणार व्याज? शेअर बाजाराचा होणार असा परिणाम  title=

EPFO News: जर तुम्हीही पगारदार वर्गातील असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) त्यांच्या कोट्यवधी सदस्यांना निश्चित व्याजदर प्रदान करण्यासाठी एक नवीन राखीव निधी तयार करण्याची योजना आखत आहे. यामुळे, पीएफ खातेधारकांना दरवर्षी निश्चित व्याज मिळू शकेल आणि त्यांना बाजारातील चढउतारांपासून दिलासा मिळेल. हा निधी तयार करण्यासाठी, कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि ईपीएफओचे अधिकारी अंतर्गत अभ्यास करत आहेत.

ठराविक रक्कमेची होते गुंतवणूक 

पीएफ फंडाचा एक निश्चित भाग ईपीएफओ द्वारे बाजारात गुंतवला जातो. अनेक वेळा ईपीएफओला एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) आणि इतर गुंतवणुकीवर कमी परतावा मिळतो. याचा फटका ईपीएफओ सदस्यांनाही सहन करावा लागतो. जेव्हा शेअर बाजारात घसरण होते तेव्हा त्याचा परिणाम ईपीएफओ गुंतवणुकीवर मिळणाऱ्या रकमेवरही होतो. कमी परताव्यांमुळे, ईपीएफओला पीएफवरील व्याजदर देखील कमी करावा लागतो.

अशा समस्या टाळण्यासाठी, ईपीएफओ एक राखीव निधी तयार करण्याचा विचार करत आहे जो गुंतवणुकीवरील परतावा स्थिर ठेवेल. यामुळे पीएफ खातेधारकांना बाजारातील परिस्थिती काहीही असो, दरवर्षी निश्चित व्याज मिळू शकेल.

हा निधी कसा काम करेल?

हिंदुस्तान वेबसाइटमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, ईपीएफओ या योजनेअंतर्गत दरवर्षी मिळणाऱ्या व्याजाचा एक भाग बाजूला ठेवून राखीव निधीमध्ये जमा करेल. जेव्हा जेव्हा बाजारात घसरण होते आणि गुंतवणूक कमी परतावा देते तेव्हा या फंडाचा वापर करून व्याजदर स्थिर ठेवला जाईल. ईपीएफओच्या सात कोटींहून अधिक सदस्यांना याचा फायदा होईल.

निर्णय कधी घेतला जाईल?

सध्या ही योजना सुरुवातीच्या टप्प्यात आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि ईपीएफओचे अधिकारी याचा अभ्यास करत आहेत. पुढील चार ते सहा महिन्यांत यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. 1952-53 मध्ये जेव्हा ईपीएफओ सुरू झाला तेव्हा पीएफवर फक्त 3% व्याज मिळत होते. 1989-90 पर्यंत ते 12% पर्यंत वाढले, जे 2000-01 पर्यंत चालू राहिले. यानंतर वेळोवेळी त्यात बदल करण्यात आले. सध्या, 2023-24 मध्ये ईपीएफओचा व्याजदर 8.25% आहे.

28 फेब्रुवारी रोजी एक महत्त्वाची बैठक 

2024-25 या आर्थिक वर्षासाठी पीएफ व्याजदर निश्चित करण्यासाठी ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची (सीबीटी) 28 फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे. व्याजदर स्थिर ठेवण्याबाबत किंवा तो किरकोळ वाढवण्याबाबत चर्चा होऊ शकते. व्याजदरात कपात होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे सांगितले जात आहे.