Video: लँड होताच विमान पलटी; Plane Crash नंतर चा व्हिडीओ पाहून म्हणाल हा प्रवास नको रे बाबा!

Toronto Plane Crash Video:  टोरंटोमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर सोशल मीडियावर घटनास्थळाचे व्हिडीओ व्हायरल झाले.   

सायली पाटील | Updated: Feb 18, 2025, 08:46 AM IST
Video: लँड होताच विमान पलटी; Plane Crash नंतर चा व्हिडीओ पाहून म्हणाल हा प्रवास नको रे बाबा! title=
Viral video of Toronto plane crash passengers seen hanging upside down

Toronto Plane Crash Video: 2024 या वर्षाच्या शेवटी अनेक विमान अपघातांनी मनात धडकी भरवलेली असतानाच आता 2025 च्या सुरुवातीलासुद्धा एक हादरवणारा विमान अपघात समोर आला आहे. सोशल मीडियावर या अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असून, स्थानिक वेळेनुसार सोमवारी दुपारच्या सुमारास कॅनडाच्या टोरंटो इथं असणाऱ्या पियर्सन विमानतळावर हा अपघात झाला. 

प्राथमिक माहितीनुसार हा अपघात झाला तेव्हा विमानात 80 प्रवासी होते. बर्फानं झाकलेल्या धावपट्टीवर विमान लँड होताच अचानक ते उलटकं आणि एका क्षणात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या अपघातामध्ये 17 प्रवासी जखमी झाल्याचं म्हटलं जात आहे. जखमींपैकी दोन महिला (अनुक्रमे वय 60 व 40 वर्षे) आणि एक बाळ गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. विमान दुर्घटनेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार वैमानिक आणि क्रू मेंबर सुखरूप असल्याचं कळत आहे. 

या दुर्घटनेतून बचावलेल्या एका महिलेनं विमान उलटल्यानंतर एक व्हिडीओ चित्रीत केला. या व्हिडीओमध्ये ही महिला खाली डोकं वर पाय, अशा स्थितीत आसनावर अडकलेल्या अवस्थेत दिसली. 'आमचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे आणि इथं मी अडकलेय...' असं म्हणत विमानातून बाहेर येण्यासाठी ती धडपड करताना दिसत आहे. काही व्हिडीओंमध्ये प्रवासी भयभीत असल्याचं दिसत असून विमानातील क्रू त्यांना विमानातून बाहेर काढण्यास मगत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

दुर्घटनेनंतर धावपट्टी बंद....

सोमवारी दुपारच्या सुमारास हे विमान मिनियापोलिसहून टोरंटो इथं येत होतं. या विमानात 80 प्रवासी असून,त्यांच्यासह क्रू मेंबरही होते. पील क्षेत्रातील पॅरामेडिक अधिकाऱ्याच्या माहितीनुसार या अपघातानंतर काही तास ही धावपट्टी बंदच ठेवण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात आणत उलटं पडलेलं विमान तिथून हटवेपपर्यंत इथं सेवा विस्कळीत झाली होती. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : ऋतूचक्राला 360 अंशांनी कलाटणी; मुंबईसह महाराष्ट्रात उन्हाच्या झळा, उत्तरेकडे हिमवृष्टी 

अती हिमवृष्टीमुळं टोरंटोमध्ये अनेक विमानसेवा प्रभावित झाल्या होत्या. याचदरम्यान या विमानतळावरून प्रवाशांची ये-जा वाढणं अपेक्षित असून, हिमवादळसदृश वातावरण यास कारणीभूत ठरत होकतं. दरम्यान कॅनडा परिवहन विभाग आणि डेल्टा एअरलाईन्सच्या माहितीनुसार  'फ्लाइट 4819' हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं असून, प्रवाशांचं हित केंद्रस्थानी ठेवत तातडीनं त्यांच्यापर्यंत आवश्यक मदत पोहोचवल्याचं सांगितलं. सुदैवानं तूर्तास या दुर्घटनेत कोणत्याही जीवित हानीचं वृत्त समोर आलेलं नाही.