Sanjay Gandhi National Park: बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गुजरात येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून आणलेली सिंहाची जोडी आता सिंह सफारीत दाखल झाली आहे. दरम्यान, ही जोडी २६ जानेवारी रोजी उद्यानात आणण्यात आली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारी आणि व्याघ्र सफारीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. सिंह सफारीत गुजरातहून आणलेली ‘मानस’ आणि ‘मानसी’ ही सिंहाची जोडी लोकप्रिय ठरली आहे. दरम्यान, या सफारीत आता सिंहाची नवीन जोडी दाखल झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीला नव्याने चालना मिळणार आहे.
गुजरात येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून २६ जानेवारी रोजी सिंहाची ही जोडी आणण्यात आली होती. ही सिंहाची जोडी तीन वर्षांची आहे. काही दिवस या जोडीला निरिक्षण कक्षात ठेवण्यात आले होते. आता ही जोडी सिंह सफारीत दाखल झाली आहे. त्यामुळे यापुढे पर्यटकांना सिंहाची नवी जोडीही पाहता येणार आहे.
बोरिलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीमध्ये तब्बल 14 वर्षांनी सिंहाच्या छाव्याचा जन्म झाला आहे. मानसी नावाच्या मादी सिंहीणीने एका छाव्याला जन्म दिला होता. 2022 मध्ये सिंहाची ही जोडी नॅशनल पार्कमध्ये दाखल झाली होती. मागील वर्षी उद्यानातील पथकाने मानसी आणि मानस यांच्या मिलनसाठी प्रयत्न सुरू केले होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये तपासणीअंती मानसी गरोदर असल्याचे समजले. गुरुवार, १६ जानेवारी रोजी रात्री मानसीने एका छाव्याला जन्म दिला.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात २००९ मध्ये रवींद्र आणि शोभा ही सिंहाची जोडी आणण्यात आली होती. गोपा आणि जेस्पा हे या जोडीचे छावे. सिंहाचे हे चौकोनी कुटुंब गेली अनेक वर्षे पर्यटकांसाठी आकर्षण ठरले होते. काही वर्षांपूर्वी शोभाचा मृत्यू झाला. त्यानंतर २०२१ मध्ये गोपा आणि रवींद्र, तसेच जेप्सा यांचा २०२२ मध्ये मृत्यू झाला. याचदरम्यान २०२२ मध्ये गुजरातमधून ‘मानस’ आणि ‘मानसी’ या जोडीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते.