Prithvik Pratap Got Married : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील सगळ्या कलाकारांची एक वेगळीच लोकप्रियता आहे. या कार्यक्रमातून प्रकाश झोतात आलेल्या अभिनेता पृथ्वीक प्रतापनं त्याच्या हटके अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. हाच सगळ्यांचा लाडका पृथ्वीक नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. पृथ्वीक प्रतापनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
पृथ्वीकनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं आहे की '25-10-2024. एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने!' मात्र, पृथ्वीकनं त्याची पत्नी कोण आहे हे सांगितलेलं नाही. त्यानं तिला मेन्शन केलेलं नाही किंवा इन्स्टाग्रामवर कोलॅब केलेलं नाही. त्यामुळे आता ही कोण असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र, असं असलं तरी देखील प्रसाद खांडेकरच्या कमेंट आणि पोस्टमुळे पृथ्वीकच्या पत्नीचं नाव काय आहे ते कळलं आहे. पृथ्वीकच्या पत्नीचं नाव प्राजक्ता आहे.
त्याच्या पोस्टवर कमेंट करत लोकं त्याला शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री श्रुती मराठेनं त्यावर कमेंट करत 'सगळ्यात जास्त कोणी आनंदी असेल तर ती मी आहे' असं म्हटलं आहे. सारंग साठे कमेंट करत म्हणाला, 'आजवर पाहिलेल्या लग्नांच्या फोटोमध्ये हे सगळ्यात जास्त सुंदर फोटो आहेत.' अभिनेत्री इशिता अरुण कमेंट करत म्हणाली, 'वेल डन पार्टनर.' प्रसाद खांडेकरनं कमेंट करत म्हटलं की 'अभिनंदन पृथ्वीक आणि प्राजक्ता.' त्यासोबत त्यानं लाल रंगाची हार्ट इमोटीकॉन देखील शेअर केले आहेत. इतकंच नाही तर प्रसादनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. अमृता खानविलकर म्हणाली, 'अभिनंदन गोड जोडी.' त्यासोबत अभिजीत खांडेकर, अश्विनी महांगडे, स्वानंदी टिकेकर, गायत्री दातार, अक्षया नाईक, रुतुराज फडके सारख्या अनेक कलाकारांनी पृथ्वीक आणि प्राजक्ताला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.