मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं. आता अनलॉक केल्यानंतर काही नियम शिथिल करत मालिकांच्या चित्रीकरणाला सुरूवात केली. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या शुटिंगलाही काही दिवसांपू्र्वी सुरूवात झाली. शुटिंग दरम्यान सरकारने दिलेल्या सगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. शुटिंग सुरू होऊन पुन्हा आपल्या आठवडती पात्र आपल्या भेटीला येणार आहेत. मात्र आता या मालिकेतील एका व्यक्तीचं निधन झालं आहे.
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील अभिनेता विजय वीर यांचे निधन झाल्याचे समजते आहे. विजय वीर हे सहकलाकार म्हणून मालिकेत काम करत होते. या मालिकेतील गुलमोहर सोसायटीतील वॉचमनची भूमिका ते साकारत होते. २० जुलै रोजी रात्री ८.३० च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच सहकलाकारांनी दुःख व्यक्त केलं. या मालिकेव्यतिरिक्त विजय वीर यांनी नऱ्या आणि माधव अशा काही मराठी, हिंदी सिनेमात देखील काम केलं होतं. अनलॉकनंतर आता मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. पण "गुलमोहर' सोसायटीचे वॉचमन त्यांच्या भेटीला येणार नाहीत.
१३ जुलैपासून झी मराठीवरील मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. गेल्या तीन महिन्यात लॉकडाऊनमुळे मालिकांच चित्रिकरण थांबल होतं. आता या नव्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना वॉचमन काकांना पाहता येणार नाही.