दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारक समितीमधून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना काढून टाकावे असा ठराव शिवसेनेच्या बैठकीत झाला आहे. उद्धव ठाकरे समितीच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांना अध्यक्षपदावरुन हटवावं असा ठराव करण्यात आला आहे. हा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाणार आहे. शिवसेनेच्या बैठकीनंतर रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली. या बैठकीत बैठकीत संघटनात्मक तसंच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत सुद्धा चर्चा झाली .
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार जपले नसून, त्यांच्या विचारांपासून फार लांब गेले आहेत त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे त्यांना पदावरुन काढावं असा ठराव करण्यात आला असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं आहे. यासह शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहितीही रामदास कदम यांनी दिली आहे.
"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. शिवसेनेच्या विचारधारेला काळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. आम्ही 45 वर्ष मातोश्री जवळून पाहिली. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचाराला हरताळ फासलं, लाचारी पत्करून काँग्रेस सोबत गेले त्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी भाषणाचा अजिबात अधिकार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ शासन म्हणून उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी असा ठराव आम्ही आज बैठकीत मंजूर केला आहे. लवकरच आम्ही मुख्यमंत्र्यांना ठराव अहवाल देऊ," असं रामदास कदम यांनी सांगितलं.
दरम्यान 24 तारखेला शिवसेनेमधील सर्व पदाधिकारी यांची पद रद्द करण्यात येतील आणि एक समिती नवीन पद नियुक्ती करतील. विधानसभा व लोकसभा च्या कामाच्या मेरिट वर ही नवीन पदं असतील असंही रामदास कदम यांनी सांगितलं आहे.
"23 तारखेला मुंबईच्या बीकेसीमध्ये भव्य मेळावा पार पडेल. त्या मेळाव्यात शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार यांचा भव्य सत्कार केला जाईल. मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार होईल. 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा मेळावा आयोजित केला आहे. मुंबईतील सर्व शाखाप्रमुख आणि सर्व पदं रिक्त करून नवीन नियुक्ती केली जाईल. मुलाखती घेऊन तशा प्रकारचे नियुक्ती केली जाईल. कोणी कशाप्रकारे काम केलं याचा आढावा घेऊन समिती अशा प्रकारे निर्णय घेऊन नियुक्ती करेल. गिरगाव, दादर अशाप्रकारे समित्या गठीत केल्या जातील. ज्या समितीला जे नाव योग्य वाटेल ते नाव ती समिती मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना कळवेल आणि मग मुख्य नेते एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेऊन नियुक्ती करतील असा निर्णय आजच्या बैठकीत झाला," असं रामदास कदम यांनी सांगितलं आहे. त्यानंतर 24 तारखेपासून 9 तारखेपर्यंत आपण सभासद नोंदणी करत आहोत असंही त्यांनी सांगितलं.
"आगामी पालिकेबद्दल मुख्य नेते एकनाथ शिंदे निर्णय घेतील. शिवसेना-भाजप अशी आमची युती आहे. आमच्या युतीमध्ये अजिबात मतभेद नाहीत. कोणी आमच्या युतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तरीही आमची युती राहील," असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे.
"उद्धव ठाकरे यांना आता भीती वाटायला लागली. उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत बोलले. निर्लज्जम सदा सुखी अशा प्रकारे येथे आहेत. मला ते सांगायला सुद्धा लाज वाटते इतका खालच्या पातळीत बोलले," अशी टीका त्यांनी केली.