Nivedita Saraf on Toliets in Theatres: नाट्यगृहांमधल्या दुरावस्थेबद्दल अनेक मराठी कलाकार बोलताना दिसतात. त्यामुळे या विषयावर अनेकदा चर्चा, वाद होताना दिसतो. सध्या याच विषयावर ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही आपली नाराजी आणि आपला वाईट अनुभव शेअर केला आहे. यावेळी एका मुलाखतीत त्यांनी आपलं मतं मांडलं आहे. निवेदिता सराफ यांनी अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांतून कामं केली आहेत. सध्या त्यांची 'कलर्स मराठी'वरील 'भाग्य दिले तू मला' ही मालिका प्रचंड गाजते आहे. याआधी त्यांची 'झी मराठी वाहिनी'वरील 'अग्गंबाई सासूबाई' आणि 'अग्गंबाई सूनबाई' या दोन मालिका प्रचंड गाजल्या होत्या. 1980-90 च्या काळात आलेले त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत.
चित्रपटगृहांची अवस्था सध्या फारच सुधारते आहे आणि सोबतच मोठे मल्टिप्लेक्सेसही आता फार लक्झरीयस झाले आहेत. परंतु नाट्यगृहांची अवस्था मात्र अद्यापही बिकट आहे. त्यातून पडायला आलेल्या भिंती, खांब, टॉयलेट्समधील दुरावास्था, दुर्गेंध, फाटके पडदे, अस्वच्छता अशा अनेक तक्रारी मराठी कलाकारांकडून वारंवार येताना दिसतात. आता पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही याबद्दलचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. यावेळी सौमित्र पोटे यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत.
नाट्यगृहांच्या पायाभूत सुविधांबद्दल अनेक कलाकारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यातून आता ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 'मित्र म्हणे' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, ''नाट्यगृहांची परिस्थिती ही काही अद्याप बदलेली नाही. आमच्या काळातही नाट्यगृहांमध्ये कचऱ्याचा डबाच नसायचा. आताही नाट्यगृहांमध्ये कचऱ्याचे डबे नसतात. आपल्या लोकांनीच आपलं हे नाट्यगृहं बांधलं आहे. पण अजूनही लेडीज रूमला आतमध्ये प्रसाधनगृह नाही. कित्येक स्त्रिया येथे काम करतात. त्यांच्या मासिक पाळीचेही त्रास असतात पण येथे प्रधासनगृह नाहीत. कशाचा कुठलाही विचार केला जात नाही. व्हिलचेअरवर जी व्यक्ती असते तिला जर नाटक बघायचं असेल तर अशी सोय किती नाट्यगृहांमध्ये आहे हे तुम्ही मला सांगा.''
'''वाडा चिरेबंदी' हे नाटक करत असताना आम्हाला माईक न लावता नाटक करावं लागतं कारण या नाटकात दहा व्यक्तिरेखा आहेत पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या विंगेमध्ये तुमचा आवाजच पोहचत नाही. शासकीय कार्यक्रम नाट्यगृहांमध्ये होतात आणि हे कार्यक्रम लांबतच जातात.'' असंही त्या पुढे म्हणाल्या.
नाट्यगृहांचे खाजगीकरण करावे : निवेदिता सराफ
त्या यावेळी पुढे म्हणाल्या की, ''कलाकारही अशावेळी बाहेर उभे राहतात. मेकअप रूमही मिळालेली नसते. अलीकडेच आमच्या नाटकाचा प्रयोग होता त्याआधी नाट्यगृहांमध्ये शाळेतील मुलांचा कार्यक्रम सुरू होता. मुलं आहेत मान्य आहे पण आम्ही मुंबईहून तडतडत प्रवास करून आलो होतो. दुर्दैवानं मला व सुयशला आवाज चढवायला लागला. तेव्हा त्या बाई म्हणाल्या की इतका वेळ थांबलात थोडं अर्धा तास थांबा ना, सुरू असेलला कार्यक्रम वेळेत संपवण्याची सवय अजूनही आपल्याला लागलेली नाही. आताची जी नाट्यगृह आहेत ती प्रायव्हेट ट्रस्टला देण्याची खूप गरज आहे.''