तुम्हीदेखील वाहनांवर काका, मामा, दादा नावाच्या नंबरप्लेट लावताय? तर ही बातमी वाचाच!

RTO Fancy Number Plates: तुम्हीदेखील कार किंवा दुचाकींवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी एकदा वाचाच 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 20, 2025, 08:49 AM IST
तुम्हीदेखील वाहनांवर काका, मामा, दादा नावाच्या नंबरप्लेट लावताय? तर ही बातमी वाचाच!  title=
RTO begins one month drive against fancy number plates in mumbai maharashtra

RTO Fancy Number Plates: चारचाकी कार आणि दुचाकींवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचे वेड अलीकडे वाढत आहे. अशा फॅन्सी नंबरप्लेटच्या किंमतीही जास्त आहेत. मात्र आता अशा नंबरप्लेटवर आता कारवाई होणार आहे. काका, मामा, दादा नावाच्या नंबरप्लेट आता रडारवर आहेत. राज्यात एप्रिल, २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (एचएसआरपी) नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाने (आरटीओ) दिले आहेत. यासोबतच एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या गाड्यांवर काका, मामा, दादा असे नंबर टाकलेली गाडी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे

परिवहन आयुक्तालयाच्या सूचनेनुसार सर्व आरटीओंमार्फत १८ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार २०१९ नंतरच्या एचएसआरपी नसलेल्या गाड्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. राज्यात २०१९ नंतर नोंदणी झालेल्या नव्या वाहनांना एचएसआरपी लावणे बंधनकारक असताना अनेक वाहन चालक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरटीओच्या निदर्शनास आले आहे. 

एप्रिल २०१९ अगोदर नोंदणी झालेल्या गाड्यांवर एचएसआरपी लावण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर मोटार वाहन कायदा कलम १७७ नुसार १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे २ कोटी गाड्यांची नोंदणी २०१९ पूर्वी झाली असून या सर्व गाड्यांना एचएसआरपी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी आता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, परंतु २०१९ पूर्वीच्या फॅन्सी नंबरच्या गाड्या रस्त्यांवर धावत असल्याने केवळ अशाच गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.