270 किलोंचा रॉड अंगावर पडून मान मोडली; गोल्ड मेडलिस्ट महिला पॉवरलिफ्टरचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारा VIDEO

Viral Video: राजस्थानच्या बिकानेरमध्ये एका ह्रदयद्रावक घटनेत ज्युनिअर नॅशनल गेम्स गोल्ड मेडलिस्ट पॉवरलिफ्टर यष्टिका आचार्यचा (17) मृत्यू झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 19, 2025, 10:19 PM IST
270 किलोंचा रॉड अंगावर पडून मान मोडली; गोल्ड मेडलिस्ट महिला पॉवरलिफ्टरचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारा VIDEO title=

Viral Video: राजस्थानच्या बिकानेरमधील एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. पॉवरलिफ्टिंगचा सराव करताना राष्ट्रीय खेळाडू यष्टिका आचार्यचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यष्टिकाने आपल्या खांद्यावर 270 किलोंचं वजन उचललं होतं. यावेळी अचानक तिचा हात सुटला आणि तोल गेला. तोल गेल्याने खांद्यावरील वजन तिच्या मानेवर पडलं. इतकं वजन मानेवर पडल्याने ती तुटली. यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण डॉक्टरांना मृत घोषित केलं. 

नेमकं काय झालं?

राष्ट्रीय महिला पॉवरलिफ्टर यष्टिका आचार्य (17) ही राजस्थानमधील बिकानेर येथील नथुसर गेट येथील बडा गणेश मंदिराजवळील पॉवर हेक्टर जिममध्ये सराव करत होती. तिने आपल्या खांद्यावर 270 किलोच्या रॉडवर वजन उचललं होतं. यावेळी यष्टिकाचा मानेवर रॉ़ड पडल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्यासोबत जिममध्ये सराव करणाऱ्या इतर खेळाडूंनी सांगितलं की, यष्टिका नेहमीप्रमाणे प्रशिक्षकाच्या उपस्थितीत सराव करत होती.

सरावाच्या वेळी हात घसरल्याने अचानक तिचा तोल गेला आणि 270 किलो वजनाचा रॉड मानेवर पडला. यादरम्यान जोरदार धक्का बसला. तिच्या डोक्याचा फटका बसल्याने यष्टिकाच्या मागे उभा असलेला प्रशिक्षकही मागे पडला. यानंतर यष्टिका बेशुद्ध पडली. तिला जीममध्येच प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर तिथे उपस्थित खेळाडूंनी उपचारासाठी तिला रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

तिथे उपस्थित खेळाडूंनी सांगितलं की, ट्रेनर यष्टिकाकडून वेट लिफ्ट करुन घेत होता. त्याने एक, दोन, तीन म्हटल्यानंतर तिने वजन उचललं होतं. पण तिचा हात सुटू लागला आणि तोल गेला. सगळं वजन तिच्या मानेवर आलं. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 

नॅशनल चॅम्पिअनशीपमध्ये जिंकलं होतं गोल्ड मेडल

यष्टिकाने गोव्यात झालेल्या 33 व्या राष्ट्रीय बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये इक्विप्ड गटात सुवर्णपदक आणि क्लासिक प्रकारात रौप्यपदक जिंकलं होतं. यष्टिकाचे वडील ऐश्वर्या आचार्य (50) हे कंत्राटदार आहेत. यष्टिकाच्या मृत्यूनंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे. दरम्यान कोणीही तक्रार केली नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला.